वाई नगरपरिषदेची धडक कारवाई; विनापरवाना फ्लेक्स आणि वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या टपऱ्या जप्त
वाई प्रतिनिधी (संजीव वरे )वाई शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि विद्रुपीकरणाला आळा घालण्यासाठी वाई नगरपरिषदेच्या वतीने आज शहरात ‘अतिक्रमण हटाव’ मोहीम तीव्र करण्यात आली. या धडक मोहिमेअंतर्गत शहरातील विविध मुख्य रस्त्यांवरील विनापरवाना फ्लेक्स बोर्ड, होर्डिंग्ज तसेच वाहतुकीस गंभीर अडथळा ठरणाऱ्या अनधिकृत टपऱ्यांवर प्रशासनाने कायदेशीर कारवाई करत त्या जप्त केल्या. या कारवाईमुळे अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले आहेत.शहरातील मुख्य चौक, बाजारपेठ आणि मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर विनापरवाना फ्लेक्स लावण्यात आले होते. तसेच रस्त्यांच्या कडेला असलेल्या अनधिकृत टपऱ्यांमुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. याबाबत नागरिकांमधून सतत तक्रारी होत होत्या. या पार्श्वभूमीवर मुख्याधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषदेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने आज सकाळीच कारवाईला सुरुवात केली.या मोहिमे दरम्यान किसणवीर चौक, गणपती आळी, भाजी मंडई परिसर आणि महामार्गाला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यांवरील अनधिकृत फलक काढण्यात आले. तसेच रस्त्यावर अतिक्रमण करून वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या टपऱ्या तात्काळ जप्त करून मार्ग मोकळे करण्यात आले.नगरपरिषद प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, शहराचे सौंदर्य राखण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी ही मोहीम यापुढेही अशीच सुरू राहणार आहे.
कोणत्याही व्यावसायिकांनी किंवा नागरिकांनी रस्त्यावर अनधिकृतपणे टपऱ्या लावू नयेत अथवा विनापरवाना फ्लेक्स लावू नयेत, अन्यथा त्यांच्यावर दंडात्मक व कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा नगरपरिषदेने दिला आहे. या धडक कारवाईचे वाई शहरातील नागरिकांमधून स्वागत होत आहे.





