सातारा जिल्हा परिषदेच्या शिरपेचात मानाचा तुरा; वाई पंचायत समितीचा राज्यात डंका ऑनलाईन पेन्शन प्रदान करणारी ठरली राज्यातील पहिली पंचायत समिती
वाई (संजीव वरे ) : ग्रामविकास विभागाच्या नाविन्यपूर्ण ‘निवृत्ती वेतन वाहिनी’ प्रणालीचा प्रभावी वापर करत, सातारा जिल्हा परिषदेने आणि विशेषतः वाई पंचायत समितीने एक ऐतिहासिक यश संपादन केले आहे. जिल्हा परिषद शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची पेन्शन संपूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने यशस्वीरीत्या वितरित करणारी सातारा ही राज्यातील पहिली जिल्हा परिषद ठरली असून, यात वाई पंचायत समितीने संपूर्ण राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
यापूर्वी पारंपरिक पद्धतीने शासन स्तरावरून जिल्हा परिषदांना पेन्शनचे अनुदान वितरित केले जात होते. कोषागारातून निधी काढून तो वित्तप्रेषणाद्वारे पंचायत समित्यांकडे वर्ग केला जाई. त्यानंतर प्रत्यक्ष बिल तयार करून धनादेशाद्वारे रक्कम पेन्शनधारकांच्या बँक खात्यात जमा होण्यासाठी साधारण ५ ते ७ दिवसांचा अवधी लागायचा. सार्वजनिक सुट्ट्या आल्यास हा विलंब आणखी वाढून अनेकदा १ तारखेला पेन्शन मिळणे कठीण होत असे. मात्र, या नवीन ऑनलाईन प्रणालीमुळे या सर्व तांत्रिक अडचणी दूर झाल्या आहेत.
राज्यभरातील जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना दरमहा १ तारखेला नियमित पेन्शन मिळावी, यासाठी ग्रामविकास विभागाने एका समन्वय समितीची स्थापना केली होती. यात सातारा आणि ठाणे या दोन जिल्ह्यांची प्रायोगिक तत्त्वावर निवड करण्यात आली होती. या प्रक्रियेत सातारा जिल्ह्याने उल्लेखनीय कामगिरी करत शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे पेन्शन कामकाज प्रणालीत वेळेत अद्ययावत केले. यामध्ये पाऊल पुढे टाकत वाई पंचायत समितीने माहे ऑगस्टची पेन्शन थेट ३१ ऑगस्ट रोजीच पेन्शनधारकांच्या बँक खात्यात जमा करत राज्यात प्रथम क्रमांक मिळवण्याचे मानकरी ठरले.
ग्रामविकास विभागाच्या या ‘निवृत्ती वेतन वाहिनी’मुळे आता सेवानिवृत्त व कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना दरमहा निश्चितपणे १ तारखेला पेन्शन मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे. नवीन सेवानिवृत्तांचे मृत्यू नि सेवा उपदान, पेन्शन विक्री आणि पेन्शन फरक यांसारखी प्रदाने आता याच प्रणालीद्वारे होणार आहेत. तसेच, १५ वर्षांनंतर पेन्शन पुनरुज्जीवित करणे आणि वयाची ८० वर्षे पूर्ण झाल्यानंतर मिळणारी वाढीव पेन्शन यांसारखे लाभ स्वयंचलित पद्धतीने मिळणार असल्याने वयोवृद्ध पेन्शनधारकांना मोठा मानसिक व आर्थिक दिलासा मिळाला आहे.
हे यश संपादन करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय व राजकीय नेतृत्त्वाचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. यामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, मुख्य लेखा व वित्त अधिकारी राहुल कदम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले, वाई पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नारायण घोलप यांच्यासह वाई पंचायत समितीचे सभापती पै. विक्रांतभैया डोंगरे, उपसभापती वर्षाताई जगताप आणि सर्व संबंधित पदाधिकाऱ्यांचे सहकार्य लाभले. तसेच, सहाय्यक लेखाधिकारी रवींद्र बोरकर, राजलक्ष्मी साबळे, अजित घोरपडे आणि पंढरीनाथ दरेकर या पंचायत समितीच्या पेन्शन कार्यासन व लेखा कर्मचाऱ्यांनी परिश्रम, जिद्द आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा केला.अथक परिश्रम आणि उत्कृष्ट ‘टीम वर्क’मुळे सातारा जिल्हा परिषद व वाई पंचायत समितीने मिळवलेल्या या राज्यस्तरीय यशामुळे सर्वच स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.



