एम.आय.डी.सी. कोडोली, सातारा परिसरात कुंटणखान्यावर पोलीसांचा छापा, दोन पिडीत महिलांची सुटका, देहविक्रीसाठी महिलांना पुरविल्याचा आरोप कुंटणखाना चालवण्याऱ्या महिलेवर गुन्हा दाखल
पोलीस अधिक्षक, निखील पिंगळे व अपर पोलीस अधिक्षक, वैशाली कडुकर यांनी सातारा जिल्हयात अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यांन्वये कारवाई करण्याचे आदेश दिले होते.पोलीस निरीक्षक, अरविंद काळे यांना मिळालेल्या गोपनिय माहितीनुसार एम.आय.डी.सी. कोडोली, सातारा येथील जानाई मळाई सोसायटीमध्ये एका घरात महिलांना देहविक्रीसाठी पुरविले जात असल्याची माहिती मिळाली होती.
त्यानंतर पोलीसांनी बनावट ग्राहक व पंचांना पाठवून मिळालेल्या गोपनिय माहितीची खातरजमा केली. माहितीची खात्री झाल्यानंतर पोलीस निरीक्षक, अरविंद काळे व पोउनि ज्योती बैनवाड यांच्या पथकाने सातारा शहरातील एम.आय.डी.सी. कोडोली, सातारा येथील जानाई मळाई सोसायटीमध्ये एका घरात बेकायदेशीरपणे चालवल्या जाणाऱ्या कुंटणखान्यावर धडक कारवाई करून दोन पिडीत महिलांची सुटका केली. या प्रकरणी महिलांना देहविक्रीसाठी पुरविल्याचा आरोप असलेल्या एका महिलेस अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम (ITPA) व भारतीय न्याय संहितेअंतर्गत सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास सातारा शहर पोलीसांकडुन करण्यात येत आहे.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक, निखील पिंगळे व अपर पोलीस अधिक्षक, वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, अरविंद काळे, पोउनि ज्योती बैनवाड, पोलीस अंमलदार सपोउनि रामचंद्र गुरव, पोहवा अजित कर्णे, मुनिर मुल्ला, पंकज बेसके, गौरी कुटे, क्रांती जाधव, सुगरण राऊत यांनी केली असल्याने श्री निखील पिंगळे, पोलीस अधिक्षक, सातारा व श्रीमती वैशाली कडुकर, अपर पोलीस अधिक्षक, सातारा यांनी कारवाई करणाऱ्या अधिकारी व अंमलदार यांचे अभिनंदन केले आहे.




