कराड अर्बन बँकेला ‘सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार’ जाहीर
कराड :सहकारी बँकिंग क्षेत्रात आपल्या उल्लेखनीय कामगिरीचा ठसा उमटवणाऱ्या दि कराड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड कराड (शेड्युल्ड बँक) यांना ‘दि महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लिमिटेड’ यांच्या वतीने दिला जाणारा सन २०२५-२६ चा अत्यंत प्रतिष्ठेचा ‘सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार’ जाहीर झाला आहे. या श्रेणीतून सलग दुसऱ्या वर्षी हा बहुमान मिळवत बँकेने सातत्य राखले आहे.
बँकेने रु. २५०१ कोटींच्या वर ते रु. ५००० कोटींपर्यंत ठेवी असलेल्या बँका या गटामध्ये राज्य पातळीवर ‘तृतीय’ क्रमांकाचा बहुमान मिळवला आहे. सहकार क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य, बँकेची प्रगती आणि सभासद, ग्राहक व हितचिंतकांचा विश्वास याची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आला आहे.
‘दि महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लिमिटेड’ यांच्या वतीने देण्यात येणारा हा ‘सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार’ सहकार क्षेत्रातील महत्वाचा सन्मान मानला जातो.
बँकेचे कुशल तरुण नेतृत्व देणारे बँकेचे अध्यक्ष समीर जोशी, उपाध्यक्ष शशांक पालकर, बँकेचे व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष डॉ. अनिल लाहोटी व मुख्य कार्यकारी अधिकारी सीए धनंजय शिंगटे यांनी नियोजनबध्द केलेल्या वाटचालीमुळे तसेच कुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी व बँकेचे माजी अध्यक्ष डॉ. सुभाष एरम ह्यांच्या मार्गदर्शनामुळे बँकेने गतवर्षात शेवटच्या सहा महिन्यात व्यवसायात जवळपास ७५० कोटींच्या वर ऐतिहासिक वाढ नोंदविली आहे. बँकेने व्यवसाय वाढीमध्ये कायम सातत्य ठेवले आहे.
सभासद, ग्राहक, हितचिंतक, संचालक मंडळ आणि सेवक वर्ग या सर्वांच्या कृतिपूर्ण योगदानामुळे बँकेला सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार प्राप्त झाला आहे.या गौरवशाली पुरस्काराचा वितरण सोहळा शनिवार, दिनांक १२ सप्टेंबर, २०२६ रोजी दुपारी ठीक २ वाजता ‘एक्सप्रेस इन हेरिटेज’, जालना रोड, केंब्रिज स्कूलच्या समोर, सुंदरवाडी छत्रपती संभाजीनगर येथे होणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी सीए.धनंजय शिंगटे यांनी दिली. कराड अर्बन बँकेचे या उल्लेखनीय यशाबद्दल विविध स्तरांमधून अभिनंदन केले जात आहे.




