पाचगणी येतील शॉपिंग सेंटर परिसरातील सुलभ शौचालयाच्या कामाचे भूमिपूजन
पाचगणी शहर विकास आघाडीची वचनपूर्ती; नागरिकांची अनेक वर्षांची मागणी अखेर मार्गी
पाचगणी प्रतिनिधी : पाचगणी शहरातील मुख्य शॉपिंग सेंटर परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली सुलभ शौचालयाची मागणी अखेर मार्गी लागली आहे. पाचगणी गिरिस्थान नगरपरिषदेच्या माध्यमातून प्रादेशिक पर्यटन योजनेंतर्गत उभारण्यात येणाऱ्या नवीन सुलभ शौचालयाच्या कामाचा भूमिपूजन समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला.
शहरातील मध्यवर्ती व वर्दळीच्या शॉपिंग सेंटर परिसरात सुलभ शौचालयाची सुविधा उपलब्ध नसल्याने स्थानिक नागरिक, व्यावसायिक तसेच पर्यटकांची मोठी गैरसोय होत होती. ही बाब लक्षात घेऊन पाचगणी शहर विकास आघाडीच्या माध्यमातून सुलभ शौचालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. या कामामुळे परिसरातील नागरिकांसह पर्यटकांना मोठा दिलासा मिळणार असून, स्वच्छता आणि सार्वजनिक सुविधांच्या दृष्टीनेही हे काम महत्त्वाचे ठरणार आहे.
नगरपरिषदेच्या माध्यमातून प्रादेशिक पर्यटन योजनेंतर्गत हे काम करण्यात येत असून, ‘पाचगणी शहर विकास आघाडी’ने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
भूमिपूजन सोहळ्यास नगराध्यक्ष दिलीपभाऊ बगाडे, उपनगराध्यक्षा सौ. माधुरी कासुर्डे, मुख्याधिकारी पंडित पाटील, श्री घाटजाई शहर विकास आघाडीचे अध्यक्ष तथा नगरसेवक शेखर कासुर्डे, बांधकाम सभापती राजेंद्र पारठे, नगरसेवक नारायण बिरामणे, महेश खांडके, अमित कांबळे, आकाश बगाडे, प्रवीण बोधे, गणेश कासुर्डे, नगरसेविका सुप्रिया महेश माने, विमल भिलारे, शिल्पा माने, अमय भिलारे, तसेच नगर अभियंता अभिजित सोनावले, सल्लागार अभियंता निखिल पवार यांच्यासह परिसरातील व्यावसायिक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवीन सुलभ शौचालयाचे काम पूर्ण झाल्यानंतर शॉपिंग सेंटर परिसरातील नागरिक व पर्यटकांची गैरसोय दूर होणार असून, पाचगणी शहरातील सार्वजनिक सुविधांमध्ये आणखी एक महत्त्वाची भर पडणार आहे.




