Home » देश » धार्मिक » महाबळेश्वरात ‘आपला दवाखाना’ उपक्रमांतर्गत भव्य आरोग्य शिबिर; शासकीय योजनांच्या जनजागृतीसह प्राथमिक तपासणीला उत्स्फूर्त प्रतिसाद

महाबळेश्वरात ‘आपला दवाखाना’ उपक्रमांतर्गत भव्य आरोग्य शिबिर; शासकीय योजनांच्या जनजागृतीसह प्राथमिक तपासणीला उत्स्फूर्त प्रतिसाद

महाबळेश्वरात ‘आपला दवाखाना’ उपक्रमांतर्गत भव्य आरोग्य शिबिर; शासकीय योजनांच्या जनजागृतीसह प्राथमिक तपासणीला उत्स्फूर्त प्रतिसाद

​महाबळेश्वर:आरोग्याची तपासणी करण्यासाठी दवाखान्यात जाण्यापेक्षा आरोग्यसेवाच थेट नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचली, तर त्याचा फायदा अधिक व्यापकपणे होऊ शकतो. याच उद्देशाने राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सुरू असलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ‘आपला दवाखाना’ उपक्रमाच्या माध्यमातून महाबळेश्वरच्या मुख्य बाजारपेठेतील श्री हनुमान मंदिरात विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

​महाबळेश्वर शहरातील कोळी आळी येथे नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र कार्यरत आहे. मोफत आरोग्यसेवेबरोबरच नागरिकांना केंद्र व राज्य शासनाच्या विविध आरोग्य योजनांची माहिती एकाच ठिकाणी मिळावी, या उद्देशाने नागरी आरोग्यवर्धिनी केंद्राचे डॉ. चंद्रकांत यादव यांच्या पुढाकाराने हे शिबिर घेण्यात आले.

​आरोग्य तपासणीसह योजनांची माहिती

शिबिरादरम्यान नागरिकांची रक्तदाब (BP), रक्तातील साखर (Diabetes), वजन आणि उंची यांसारख्या प्राथमिक आरोग्य तपासण्या मोफत करण्यात आल्या. याशिवाय केंद्र व राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘आयुष्मान भारत कार्ड’ आणि ‘आभा कार्ड’ (ABHA Card) बाबत सविस्तर मार्गदर्शन करून नोंदणीबाबत माहिती देण्यात आली. आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणे आणि शासनाच्या योजनांचा लाभ थेट पात्र घटकांपर्यंत पोहोचवणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू होता.

​गणेशोत्सवातही आरोग्य शिबिराचे नियोजन

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख तथा अर्बन बँकेचे संचालक राजेश कुंभारदरे यांनी नागरिकांनी या मोफत सुविधांचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन केले. तसेच, आगामी गणेशोत्सव काळातही नागरिकांच्या सोयीसाठी अशाच स्वरूपाच्या आरोग्य शिबिरांचे नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

​या शिबिराला शिवसेना शहरप्रमुख राजाभाऊ गुजर, रमेश शिंदे, प्रितेश भिसे, अमोल साळुंखे, फळणे गुरुजी, हरिशेठ येवले यांच्यासह परिसरातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. आरोग्य तपासणीसोबतच शासकीय योजनांची माहिती एकाच छताखाली मिळाल्याने नागरिकांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

रहिमतपुर पोलीसांची सुपर फास्ट कामगिरी २४ तासात सोने चोरीचा गुन्हा उघड, २ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत

रहिमतपुर पोलीसांची सुपर फास्ट कामगिरी २४ तासात सोने चोरीचा गुन्हा उघड, २ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत रहिमतपुर पोलीस ठाणे

Live Cricket