दहिवडी पोलीस स्टेशन अंतर्गत ५४ गावांमध्ये ग्राम सुरक्षा दलाची स्थापना
पोलीस अधिक्षक निखील पिंगळे यांच्या संकल्पनेतून चांगला उपक्रम
दहिवडी, ता. माण (प्रतिनिधी) -गावा गावामध्ये वाढत चाललेल्या चोऱ्या, घरफोड्या व इतर छोट्या मोठ्या गुन्ह्यांचे प्रमाण घट व्हावे या उद्देशाने मा. पोलीस अधीक्षक सो सातारा व मा. वेशाली कडूकर, अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना पोलीस व जनतेतील प्रत्येक गावामध्ये ग्राम सुरक्षा दल स्थापन करण्याबाबत आदेशित केले होते.
त्याच आदेशान्वये दहिवडी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोसावी, दहिवडी पोलीस स्टेशन यांनी दहिवडी पोलीस ठाणे हद्दीतील ५४ गावांचे पोलीस पाटील यांचे गावोगावून ५४ गावांमध्ये स्वेच्छेने काम करण्यास इच्छुक असलेल्या एकूण ७३० युवकांची नेमणूक केलेल्या ग्राम सुरक्षा दलाचा मा. निखील पिंगळे सो पोलीस अधिक्षक सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक २९/०८/२०२६ रोजी स्थापना व मार्गदर्शन कार्यक्रम दहिवडी कॉलेज दहिवडी येथील मिटिंग हॉलमध्ये संपन्न झाला.
कार्यक्रमामध्ये ग्राम सुरक्षा दलातील सदस्यांना मा. निखील पिंगळे सो, पोलीस अधिक्षक सातारा यांचे हस्ते टि शर्ट, काठी, शिट्टी व बॅटरीचे वाटप करण्यात आले. तसेच उल्लेखनीय काम करणाऱ्या श्रीपाळपण,स्वरुपखानवाडी व मार्डी येथील पोलीस पाटील यांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे मार्गदर्शन म्हणून मा. निखील पिंगळे सो पोलीसअधिक्षक सातारा यांनी मार्गदर्शन केले. मार्गदर्शनामध्ये त्यांनी गावाची सुरक्षा ही केवळ पोलीसांची जबाबदारी नसून नागरिकांच्या सहभागातून ती अधिक सक्षम होते, ग्राम सुरक्षा दलाच्या माध्यमातून रात्रीची गस्त, संशयीत हालचालींवर लक्ष, तातडीने पोलीसांपर्यंत माहिती पोहोचवणे आणि गावात सुरक्षित वातावरण निर्माण करणे
गावातील सुरक्षा ही माझी जबाबदारी हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे सांगितले. या उपक्रमामुळे चोरी, घरफोडी जनावर चोरी शेतमालाची चोरी तसेच इतर गुन्हे रोखण्यासाठी मोठी मदत होईल असा विश्वास व्यक्त केला. यावेळी त्यांनी कमी वेळेत ग्राम सुरक्षा दलाची स्थापना करुन ती कार्यान्वयीत केल्याबद्दल दहीवडी पोलीसांचे कौतुक केले, लोकसहभागातून उभा राहिलेला हा उपक्रम सातारा जिल्ह्यासाठी आदर्श ठरेल असे नमूद केले.
सदर कार्यक्रमास मा. निखील पिंगळे सो पोलीस अधीक्षक सातारा, मा. रणजीत सावंत सो, उपविभागीय पोलीस अधिकारी दहिवडी विभाग केम्प वडूज, घनश्याम सोनवणे पोलीस निरीक्षक वडुज पोलीस ठाणे, संदिप पोमण सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हसवड पोलीस स्टेशन, सुनिल जानकर सहाय्यक पोलीस निरीक्षक औंध पोलीस स्टेशन, श्री खत्रे, प्राचार्य दहिवडी कॉलेज दहिवडी, दहिवडी पोलीस ठाणेकडील अधिकारी व अंमलदार, सर्व गावातील पोलीस पाटील व ग्राम सुरक्षा दलाचे सदस्य असे मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन आप्पा गायकवाड व शेवटी दहीवडी पोलीस ठाणे चे सपोनि गोसावी यांनी सर्वाचे आभार व्यक्त केले.




