लोकमत वन वर्ल्ड समिटमध्ये यशोदा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट चा सन्मान
प्रा. डॉ. दशरथ सगरे व सौ. साधना सगरे यांच्या गौरवातून शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाची दखल
सातारा : शिक्षणाच्या माध्यमातून समाजपरिवर्तन घडवून आणत हजारो विद्यार्थ्यांच्या जीवनाला दिशा देणारे यशोदा शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. दशरथ सगरे आणि संस्थेच्या सचिव सौ. साधना दशरथ सगरे यांना मॉरिशियस मध्ये पार पडलेल्या लोकमत वन वर्ल्ड समिटमध्ये सन्मानित करण्यात आले. यावेळी संस्थेच्या विश्वस्त आर्किटेक्ट डॉ. स्वराली सगरे त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाचा, सामाजिक बांधिलकीचा आणि शैक्षणिक क्षेत्रातील दीर्घकालीन योगदानाचा गौरव म्हणून हा सन्मान विशेष महत्त्वाचा मानला जात आहे.
प्रत्येक मोठ्या संस्थेची सुरुवात ही भव्य वास्तूंनी नव्हे, तर एका स्वप्नाने होते. ग्रामीण व सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाच्या समान संधी उपलब्ध व्हाव्यात, या ध्येयातून प्रा. डॉ. दशरथ सगरे यांनी यशोदा शिक्षण प्रसारक मंडळाची पायाभरणी केली. शिक्षण हे केवळ परीक्षा उत्तीर्ण होण्याचे माध्यम नसून विद्यार्थ्यांना जीवनासाठी, नेतृत्वासाठी, नवोपक्रमासाठी आणि राष्ट्रनिर्मितीसाठी सक्षम करणारे साधन असावे, ही त्यांची भूमिका राहिली आहे.
या दूरदृष्टीला भक्कम आधार देण्याचे कार्य सौ. साधना दशरथ सगरे यांनी सातत्याने केले. संस्थेच्या जडणघडणीत त्यांचा संयमी, शिस्तबद्ध आणि विद्यार्थी-केंद्रित दृष्टिकोन महत्त्वाचा ठरला आहे. गुणवत्ता, शिस्त, संवेदनशीलता आणि विद्यार्थी कल्याण या मूल्यांना केंद्रस्थानी ठेवत त्यांनी संस्थेच्या विस्तारात मोलाची भूमिका बजावली.
यशोदाने आज अभियांत्रिकी, फार्मसी, आर्किटेक्चर, व्यवस्थापन, संगणक, पॉलिटेक्निक तसेच शालेय शिक्षण अशा विविध क्षेत्रांत आपला ठसा उमटविला आहे. बदलत्या औद्योगिक आणि जागतिक परिस्थितीचा वेध घेत संस्थेने आधुनिक अभ्यासक्रम, अत्याधुनिक प्रयोगशाळा, तंत्रज्ञानाधारित शिक्षण, संशोधन, नवोपक्रम आणि विद्यार्थी विकासाच्या विविध उपक्रमांवर भर दिला आहे.
संस्थेला मिळालेले स्वायत्ततेचे मानांकन, विविध अभ्यासक्रमांना प्राप्त झालेली नॅशनल बोर्ड ऑफ अक्रेडिटेशन ची मान्यता तसेच शैक्षणिक गुणवत्ता आणि पायाभूत सुविधांच्या विकासातील सातत्यपूर्ण वाटचाल ही या नेतृत्वाची महत्त्वपूर्ण फलश्रुती आहे. विद्यार्थ्यांसाठी आधुनिक प्रयोगशाळा, संगणक सुविधा, ग्रंथालय, संशोधन व नवोपक्रम केंद्रे, सुसज्ज वर्गखोल्या, वसतिगृहे आणि विस्तृत परिवहन व्यवस्था उभारण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशिक्षण व प्लेसमेंट, व्यक्तिमत्त्व विकास, संवाद कौशल्य, परदेशी भाषा प्रशिक्षण, औद्योगिक प्रशिक्षण, इंटर्नशिप, संशोधन आणि उद्योजकता यांसारख्या उपक्रमांना संस्थेत प्राधान्य देण्यात आले आहे. यामुळे यशोदातील अनेक विद्यार्थी देश-विदेशातील नामांकित कंपन्यांमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळत आहेत.
मात्र, संस्थेच्या भौतिक विस्तारापेक्षा विद्यार्थ्यांच्या यशकथा हीच आपल्या कार्याची खरी ओळख असल्याचे प्रा. डॉ. दशरथ सगरे आणि सौ. साधना सगरे यांनी सातत्याने अधोरेखित केले आहे. यशोदामधून शिक्षण घेतलेले विद्यार्थी अभियंते, फार्मासिस्ट, आर्किटेक्ट, व्यवस्थापक, उद्योजक, संशोधक आणि जबाबदार नागरिक म्हणून समाजाच्या विविध क्षेत्रांत योगदान देत आहेत.
हा सन्मान म्हणजे केवळ दोन व्यक्तींचा गौरव नसून, शिक्षणाला सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी माध्यम मानून उभारलेल्या एका दीर्घ आणि प्रेरणादायी शैक्षणिक प्रवासाची दखल आहे. प्रा. डॉ. दशरथ सगरे आणि सौ. साधना सगरे यांच्या नेतृत्वातून निर्माण झालेली ही शैक्षणिक परंपरा आगामी पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.




