महिलांच्या शिव्यांच्या लाखोलीत रंगला ‘बोरीचा बार ‘ ..सुखेड – बोरी गावचा उत्सव, महाराष्ट्रातील आगळीवेगळी परंपरा
खंडाळा(श्रीमंत ननावरे ): महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेतील वेगळेपण जपणारा उत्सव म्हणून ‘बोरीचा बार ‘ ओळखला जातो . सुखेड-बोरी या दोन गावांतील हजारो महिला गावच्या सीमेवरील ओढ्याजवळ येऊन एकमेकींना शिव्यांची लाखोली वाहण्याची ही परंपरा शेकडो वर्षांपासून आजही जपली आहे. यावर्षी हा उत्सव हजारो महिलांनी उत्साहात संपन्न केला. विशेषतः खंडाळ्याचा ‘बोरीचा बार’ सोशल मिडियातून सातासमुद्रापार पोहचला.
सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यात नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी चक्क शिव्यांची लाखोली वाहण्याचीच परंपरा आजही जपली. सुखेड-बोरी या दोन गावांच्या वेशीवर असलेल्या ओढ्यालगत दरवर्षीप्रमाणे ‘बोरीचा बार’ रंगला.
दुपारी बारा वाजता दोन्ही गावातील हजारो महिला ग्रामदैवताचे दर्शन घेऊन तेथून या महिला झिम्मा, फुगडी, फेर धरत सीमेवरील ओढ्यालगत जमल्या. या उत्सवात डफडे अन् हलगीचा कडकडाट आणि तुतारीच्या ललकारीच्या निनादात महिलांनी एकमेकींना हातवारे करून शिव्यांची लाखोली वाहीली. दोन्ही गावच्या महिलांमध्ये एकच उत्साह संचारला. काही महिला ओढ्याच्या पाण्यात उतरून एकमेकींच्या अंगावर पाणी टाकण्यात दंग झाल्या.
बोरीचा बार सुरू होताना दोन्ही गावातील महिलांनी एकत्र येऊन ओढ्यावर शिव्यांची लाखोली वाहिली , त्यावेळी पुरुष मंडळी ओढ्याच्या मध्यभागी उभे राहून दोन्ही महिलांना एकमेकींपासून लांब ओढण्याचा प्रयत्न करत होते. बोरीचा बार साजरा होताना हलगी व सनईच्या सुरात महिलांना अधिकच चेव चढला. यावेळी बोरीचा बार साजरा करताना महिलांचा आनंद द्विगुणित झाला होता.
खंडाळा तालुक्यासह इतर जिल्ह्यातून आलेल्या हजारो नागरिकांनी हा उत्सव पाहण्यासाठी चांगलीच गर्दी केली. महिलांना आवरण्यासाठी पोलीसांना मोठी कसरत करावी लागत होती. महिलांना आवरता आवरता पोलिसांची चांगलीच दमछाक झाली. बोरी गावाला यात्रेचे स्वरूप आले होते. मिठाई खेळण्याची दुकाने लागली होती. तरुणाई मोबाईलमध्ये क्षणचित्रे टिपण्यात दंग होती.
बोरीचा बार हा आगळावेगळा पारंपारीक उत्सव म्हणून महाराष्ट्रात ओळखला जातो. यावर्षी सुखेड येथील अहिल्या विकास प्रतिष्ठानच्या वतीने चांगला बार घालणाऱ्या महिलेला साडीचोळी देऊन सन्मानित केले.
सांस्कृतिक परंपरेतल्या या वेगळ्या उत्सवामुळे बोरी गावचे नाव महाराष्ट्राच्या नकाशावर कोरले आहे. गावातील महिला आनंदाने सहभागी होतात. त्वेषाने शिवीगाळ होत असली तरी त्यानंतर प्रेमाने एकमेकांशी वागतात. सोशल मिडियाच्या माध्यमातून हा उत्सव सातासमुद्रापार पोहचला आहे.





