सातारा–वाडेफाटा रस्त्यावरील नव्याने बांधलेला स्पीड ब्रेकर हटवला; बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा उघड
सातारा : सातारा शहरातून वाडेफाट्याकडे जाणाऱ्या अत्यंत वर्दळीच्या मार्गावर जुनी भूविकास बँकेपासून वाडेफाटा परिसरात भिक्षेकरी गृहाजवळ नुकताच उभारण्यात आलेला स्पीड ब्रेकर हटविण्यात आल्याने नागरिकांत तीव्र संताप व्यक्त होत आहे. अपघातप्रवण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मार्गावर वाहने भरधाव वेगाने धावत असून, स्पीड ब्रेकर काढून टाकण्यामागील कारण काय, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
या रस्त्यावर यापूर्वी अनेक लहान-मोठे अपघात झाले असून, अनेकांना आपला जीवही गमवावा लागला आहे. एवढेच नव्हे तर, रस्त्याचे रुंदीकरण करताना मध्यभागी संरक्षक दुभाजक (डिव्हायडर) उभारणे अत्यावश्यक असतानाही केवळ रस्ता रुंद करून काम पूर्ण झाल्याचे दाखवण्यात आले. परिणामी वाहतूक अधिक धोकादायक बनल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
स्पीड ब्रेकर हटविण्याचा निर्णय कोणाच्या आदेशाने घेण्यात आला, याची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी, तसेच या मार्गावर तातडीने सुरक्षिततेच्या उपाययोजना, डिव्हायडर आणि आवश्यक ते वाहतूक नियंत्रण उपाय राबवावेत, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.





