युरिया, डीएपीचे लिंकिंग करणाऱ्यावर गुन्हे दाखल करा – कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल
मुंबई: खरीप व रब्बी हंगामात शेतकऱ्यांना दर्जेदार व उत्कृष्ट गुणवत्तेच्या कृषी निविष्ठा प्राप्त होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत. राज्यात कृषी निविष्ठांच्या लिंकिंगला मनाई आहे, मात्र अनेक ठिकाणी युरिया, डीएपी, रासायनिक खतांचे सक्तीने लिंकिंग केले जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. लिंकिंग करणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करावेत, अशा सूचना कृषी, वित्त, नियोजन, मदत व पुनर्वसन, कामगार, विधि व न्याय राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी दिल्या.
मंत्रालयातील दालनात आयोजित नागपूर जिल्ह्यातील युरिया, डीएपी खतांसोबत रासायनिक खतांच्या सक्तीने लिंकिंग विक्रीबाबत बैठकीत राज्यमंत्री जयस्वाल बोलत होते. यावेळी कृषी विभागाचे उपसचिव संतोष कराड, निविष्ठा व गुणनियंत्रणचे संचालक सुनील बोरकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी तर दूरदृश्यप्रणालीद्वारे कृषी आयुक्त सूरज मांढरे, नागपूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, कृषी अधिकारी उपस्थित होते.
राज्यमंत्री जयस्वाल म्हणाले, खरीप व रब्बी हंगामात शेतकऱ्यांना कृषी निविष्ठा प्राप्त होण्याच्या दृष्टीने नागपूर विभागात १३३ गुणनियंत्रण निरीक्षक तर ६० तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. खत खरेदी करताना लिंकिंगचा प्रकार आढळल्यास शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या टोल फ्री क्रमांक १८०० २३३ ४००० किंवा 9822446655 वर संपर्क साधावा. शिवाय वितरक कंपनी, विक्रेते, उत्पादक यांच्यात लिंकिंगबाबत मिलीभगत असल्याचे आढळून असल्यास कृषी विभागाने कारवाई करावी. युरिया, खते, बियाणे याचे वितरण कृषी अधिकाऱ्यांनी सुरळित करावे. कृषी निविष्ठांची मागणी शेतकरी पोर्टलवर सध्या ऑनलाईन सुरू आहे, मात्र ही प्रक्रिया ऑफलाईनही सुरू ठेवावी. जेणेकरून शेतकऱ्यांना विनाअडथळा थेट खते मिळण्यास सोईचे जाईल, यापध्दतीने नियोजन करावे.





