ऑनलाइन गेमिंगचा भयंकर सापळा; सातवीतील मुलीला डिजिटल जाळ्यात ओढून ब्लॅकमेल
छत्रपती संभाजीनगर: शाळकरी मुलांना दिलेला स्मार्टफोन त्यांच्यासाठी आणि संपूर्ण कुटुंबासाठी कसा भयानक फास ठरू शकतो, याचा एक थरकाप उडवणारा प्रकार शहरात उघडकीस आला आहे. ऑनलाइन गेमिंग अॅपच्या मोहात पडलेल्या सातव्या वर्गातील मुलीस डिजिटल जाळ्यात ओढून, तिला ब्लॅकमेल करत तिचे आक्षेपार्ह फोटो घेऊन तिच्या कुटुंबाला ब्लॅकमेल केल्याचा गंभीर प्रकार घडला आहे. मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून सुशिक्षित कुटुंबातील मुलीसोबत घडलेल्या या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे.
तक्रारीनुसार, मुलीने नोव्हेंबर २०२५ मध्ये मोबाइलवर ‘रॉब्लॉक्स’ हा ऑनलाइन गेम डाऊनलोड केला. गेम खेळण्यासाठी ऑनलाइन पार्टनर शोधताना तिची ओळख ‘आर्यन अत्रे’ नाव सांगणाऱ्या ऑनलाइन गेमिंग आयडीधारकाशी झाली.
दोन दिवसांतच आरोपीने मुलीला स्नॅपचॅटवर दोन आयडी तयार करून देत पासवर्डही दिले. पुढे दोघांमध्ये चॅटिंग सुरू झाली. रॉब्लॉक्स, स्नॅपचॅटनंतर आरोपीने मुलीला व्हॉट्सअॅप सुरू करण्यास सांगितले. मुलीने नकार दिल्यावर आई-वडिलांच्या फोनमधून पैसे काढून घेण्याची धमकी दिली. घाबरलेल्या मुलीने व्हॉट्सअॅप सुरू केले. त्यावरून त्यांच्यात चॅटिंग सुरू झाली.





