महाबळेश्वर नगरपालिका: कच्च्या मतदार यादीत गैर-रहिवाशांची नावे? युवा नेत्यांना सजग राहण्याचे आवाहन.
महाबळेश्वर:महाबळेश्वर नगरपालिका हद्दीतील सर्व प्रभागांची कच्ची मतदार यादी नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे. मात्र, या प्रसिद्ध झालेल्या यादीवर स्थानिक नागरिक आणि राजकीय वर्तुळातून विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, महाबळेश्वरमध्ये प्रत्यक्षात राहत नसलेल्या शेकडो बिगर-रहिवासी व्यक्तींची नावे अजूनही येथील मतदार यादीत समाविष्ट असल्याचे समोर येत आहे. बी.एल.ओ. (BLO) तसेच बी.एल.ए. (BLA) यांच्या ढिसाळ कारभारामुळे आणि धोरणांमुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप स्थानिक स्तरावरून केला जात आहे.
अंतिम यादीपूर्वी पडताळणीचे आवाहन
या पार्श्वभूमीवर, महाबळेश्वर शहरातील आजी व भावी युवा नेत्यांनी तात्काळ पुढाकार घेऊन आपापल्या प्रभागातील मतदार याद्यांची सखोल पाहणी करावी, अशी मागणी जोर धरत आहे. अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होण्यापूर्वी यादीतील त्रुटी दूर करून ती पूर्णपणे अद्यावत आणि पारदर्शक करणे अत्यंत आवश्यक मानले जात आहे.
स्थानिक पातळीवर लोकशाही प्रक्रियेची पारदर्शकता टिकवण्यासाठी सर्वच युवा कार्यकर्त्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी सजगता दाखवून बोगस व बिगर-रहिवासी मतदारांची नावे योग्य प्रक्रियेद्वारे वगळण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले जात आहे.





