तरुणांसाठी – कम्बाईन हार्वेस्टर चालक प्रशिक्षण मेळाव्याचे ११ ऑगस्ट रोजी आयोजन
सातारा, दि. 6: महाराष्ट्र शासन कृषी विभाग, आत्मा विभाग, सातारा व कुबोटा प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांना आधुनिक कृषी यंत्रसामग्रीचा प्रभावी वापर करता यावा तसेच ग्रामीण भागातील तरुणांना कौशल्याधारित रोजगार व स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, या उद्देशाने -कम्बाईन हार्वेस्टर चालक प्रशिक्षण मेळावा मंगळवार, दि. ११ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता कृषी विकास भवन, तालुका कृषी अधिकारी, कार्यालय, सातारा येथे आयोजित करण्यात आला आहे.
ग्रामीण व स्थानिक भागातील १८ वर्षांवरील इच्छुक तरुण युवक, शेतकरी व कृषी यंत्रसामग्रीमध्ये रुची असणाऱ्या व्यक्तींनी या प्रशिक्षण मेळाव्यात सहभागी व्हावे. भविष्यात स्वयंरोजगाराची सधी निर्माण करण्यासाठी हे प्रशिक्षण उपयुक्त ठरणार आहे. या प्रशिक्षणामध्ये कॉम्बाईन हार्वेस्टरची प्राथमिक माहिती, सुरक्षितपणे यंत्र चालविण्याची पद्धत, यंत्राची देखभाल व दैनंदिन तपासणी, काढणीच्या वेळी घ्यावयाची काळजी तसेच प्रत्यक्ष यंत्र चालविण्याचे प्रशिक्षण याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. इच्छुक युवकांनी प्रशिक्षण मेळाव्यास उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन तालुक कृषी अधिकारी तेजदिप ढगे यांनी केले आहे.





