तीन बालकामगारांची सुटका, मालकावर गुन्हा दाखल
सातारा दि. 5: जुनी एमआयडीसी, सातारा कंपनीवरील आस्थापनावर सहायक कामगार आयुक्त कार्यालयाने धाड टाकून ३ बालकामगारांची सुटका केली आहे. याप्रकरणी कारखान्याचे मालकाविरुद्ध सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिनांक ३ ऑगस्ट २०२६ रोजी कामगार अधिकारी आणि दुकाने निरीक्षकांच्या पथकाने बी-४३, जुनी एमआयडीसी येथील आस्थापनाची तपासणी करण्यात आली. यावेळी उत्तर प्रदेश येथील रहिवासी तीन किशोरवयीन कामगार कपाटाचे भाग उचलून ठेवणे, कटिंग करणे आणि तयार झालेल्या कपाटांना पेंटिंग करणे अशी कामे करताना आढळून आले.
सदर आस्थापना ही धोकादायक प्रक्रियेच्या व्याख्येत येत असल्याने, बाल व किशोरवयीन कामगार (प्रतिबंध व विनियमन) अधिनियमांतर्गत ही कारवाई करण्यात आली. ही धडक कारवाई सरकारी कामगार अधिकारी श्रीमती अ. प्र. वालावलकर, श्रेणी-२ चे दुकाने निरीक्षक श्री. ह. कि. धापटे, श्री. घ. व. जाधव आणि श्री. अ. इ. पटेल यांच्या संयुक्त पथकाने केली.
बाल व किशोरवयीन कामगार (प्रतिबंध व नियमन) अधिनियम, १९८६ अन्वये १४ वर्षांखालील बालकांना कोणत्याही धोकादायक किंवा बिगरधोकादायक व्यवसायात काम करण्यास सक्त मनाई आहे. तसेच १४ ते १८ वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुलांना कोणत्याही धोकादायक प्रक्रियेत कामावर ठेवणे हा गंभीर व शिक्षेस पात्र गुन्हा आहे. सातारा जिल्ह्यातील सर्व दुकाने, आस्थापना, कारखाने, वीटभट्ट्या, चित्रपटगृहे, गॅरेज व इतर उद्योगांनी बाल व किशोरवयीन कामगारांना कामावर ठेवू नये, अन्यथा संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे सहायक कामगार आयुक्त नि.कृ. कवले यांनी कळविले आहे.





