FSSAI ची डाबरवर कारवाई; ‘100%’ दाव्यांवरील उत्पादनांच्या विक्रीला स्थगिती
नवी दिल्ली : भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) ने डाबर इंडिया लिमिटेडच्या काही खाद्यपदार्थांवर महत्त्वाची कारवाई करत, उत्पादनांवरील दिशाभूल करणाऱ्या “100% Pure”, “100% Natural”, “100% Organic” आणि तत्सम दाव्यांवर आक्षेप घेत संबंधित उत्पादनांची विक्री तात्पुरती थांबवण्याचे निर्देश दिले आहेत. FSSAI च्या मते, अशा प्रकारचे दावे ग्राहकांची दिशाभूल करू शकतात आणि अन्न लेबलिंग व जाहिरात नियमांचे उल्लंघन ठरू शकतात.
या कारवाईमध्ये डाबर हनी, काऊ घी, व्हर्जिन नारळ तेल, ॲपल सायडर व्हिनेगर, तीळ तेल, नारळ पाणी, नारळ दूध तसेच “100%” दावे असलेली इतर काही खाद्य उत्पादने तपासाच्या कक्षेत आली आहेत. FSSAI ने कंपनीला अशा उत्पादनांची विक्री थांबवून आवश्यक सुधारणा करण्याचे निर्देश दिले असून, कारवाईबाबतचा अहवालही सादर करण्यास सांगितले आहे.
दरम्यान, डाबर इंडियाने आपल्या निवेदनात कंपनीचे उत्पादन दर्जेदार आणि नियमांनुसार असल्याचा दावा केला आहे. तसेच FSSAI च्या निर्देशांचे पालन करत उत्पादनांवरील लेबल आणि पॅकेजिंगमध्ये आवश्यक बदल करण्यात येत असून, या प्रकरणात कायदेशीर पर्यायांचाही विचार सुरू असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.
ग्राहकांच्या हिताचे संरक्षण, अचूक माहिती आणि पारदर्शक लेबलिंग सुनिश्चित करण्यासाठी FSSAI ने ही कारवाई केल्याचे सांगितले आहे. अन्नपदार्थ खरेदी करताना ग्राहकांनी उत्पादनावरील दावे, घटकांची माहिती आणि प्रमाणपत्रे काळजीपूर्वक तपासावीत, असेही तज्ज्ञांचे मत आहे. या कारवाईमुळे अन्न उद्योगातील जाहिरात व लेबलिंगच्या नियमांकडे अधिक गांभीर्याने पाहिले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.




