सहकार भूषण धन्वंतरी पतसंस्थेमध्ये गुरूपौर्णिमा उत्साहात साजरी
सातारा -धन्वंतरी ना. सह. पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयात दि. २९ जुलै रोजी गुरुपौर्णिमा (व्यासपौर्णिमा) अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली. आपल्या आयुष्याला आकार देणाऱ्या गुरूप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी धन्वंतरी कुटुंबातील प्रत्येक घटक सदर कार्यक्रमास उपस्थित होता.
या प्रसंगी बोलताना संस्थापक चेअरमन डॉ. रविंद्र भोसले म्हणाले की, या दिवसाला ‘व्यासपौर्णिमा’ असेही म्हणतात. महाभारताचे रचयिते आणि वेदांचे वर्गीकरण करणारे महर्षी वेदव्यास यांच्या जयंतीनिमित्त हा उत्सव साजरा केला जातो. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील पहीला गुरू ही आई असते म्हणूनच म्हणतात ना स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी . तसेच आधुनिक डिजिटल युगातही गुरु-शिष्याची ही प्राचीन परंपरा तितक्याच आदराने आपल्या धन्वंतरीमध्ये जपली जाते याचा अभिमान आहे. आपला सर्वाचा उत्साह व गुरूप्रती आदर हेच धन्वंतरीच्या यशाचे गमक आहे. गुरू हे केवळ पुस्तकी ज्ञान देत नाहीत, तर ते माणसाला जगण्याचा खरा मार्ग दाखवतात. आजच्या वेगवान जगात गुरुपौर्णिमेचा हा सण आपल्याला संयम आणि मूल्यांची आठवण करून देतो,” असे प्रतिपादन त्यांनी केले.
याप्रसंगी बोलताना व्हा. चेअरमन डॉ. कांत फडतरे म्हणाले की, शिक्षण क्षेत्रामध्ये प्रदिर्घ अनुभव असलेले प्राचार्य डॉ. रविंद्र भोसलेसर आपल्या पतसंस्थेचे संस्थापक आहेत व त्यांचे मार्गदर्शनामुळेच आपली संस्था सहकारातील एक आदर्श संस्था ठरली आहे. त्यांच्यासारखा गुरू आपणांला मिळणे हे आपले भाग्य आहे.
आपल्या सर्व संचालक मंडळाला वैदयकीय ज्ञानाबरोबर आर्थिक संस्थांचे संचालन करणेचे, वेळोवेळी संयमाने व सदसदविवेकबुध्दीने निर्णय घेवून त्याप्रमाणे कार्य करण्याचे ज्ञान सरांमुळेच अवगत झाले आहे व यापुढेही ते कायम मिळत राहणार आहे. तसेच गुरूने दिला ज्ञानरूपी वसा आम्ही चालवू यापुढे हा वारसा या उक्तीप्रमाणे आपण सर्वजण सरांच्या मार्गदर्शनाखाली धन्वंतरी पतसंस्थेला सर्वोच्च स्थानावर नेवून सहकार महर्षी हा पुरस्कार निश्चीतच प्राप्त करू असे आश्वासन दिले.
याप्रसंगी संस्थापक चेअरमन डॉ. रविंद्र भोसलेसर यांचा आदर सत्कार धन्वंतरी कुटुंबाच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजय पवार यांचे हस्ते तर व्हा. चेअरमन डॉ. कांत फडतरे यांचा सत्कार तपासणी अधिकारी श्री. मंगेश शेवडे यांचे हस्ते व संचालक डॉ. शकील अत्तार यांचा सत्कार उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीहरी डिंगणे यांचे हस्ते करण्यात आला.सदर प्रसंगी धन्वंतरी कुटुंबातील अधिकारी व सेवकवर्ग उपस्थित होते.





