महाबळेश्वर-मेढा एसटी बस अपघातातील मृत नरेश भोंडेकर यांच्या कुटुंबाला तातडीने शासकीय मदत मिळावी; रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची प्रशासनाकडे निवेदनाद्वारे मागणी
महाबळेश्वर:महाबळेश्वर-मेढा मुख्य रस्त्यावर माचूतर गावाच्या हद्दीत शनिवारी दुपारी झालेल्या एसटी बस व दुचाकीच्या भीषण अपघातात टेकवली येथील मोबाईल व्यावसायिक श्री. नरेश रमेश भोंडेकर (वय ४५) यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. मृत नरेश भोंडेकर हे कुटुंबातील एकमेव कमावते पुरुष होते. त्यांच्या अचानक जाण्याने त्यांच्या पत्नी, ४ वर्षांचा मुलगा आणि अवघ्या ८ महिन्यांची चिमुरडी मुलगी असा निराधार परिवार मागे उरला असून, कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
या पीडित कुटुंबाला तातडीने शासकीय आर्थिक मदत आणि सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) महाबळेश्वर तालुक्याच्या वतीने आक्रमक पाऊल उचलण्यात आले. आरपीआयचे महाबळेश्वर तालुका अध्यक्ष जॉन जोसेफ यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज महाबळेश्वर येथील विविध शासकीय कार्यालयांना भेट देऊन प्रशासनाला मागण्यांचे अधिकृत निवेदन सादर केले.
या प्रमुख कार्यालयांना देण्यात आली निवेदने:
मा. तहसीलदार कार्यालय, महाबळेश्वर: तहसीलदार साहेबांना दिलेल्या निवेदनात भोंडेकर कुटुंबाची बिकट आर्थिक परिस्थिती लक्षात घेता त्यांना ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’तून विशेष आर्थिक मदत मिळण्याची शिफारस करावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच मृत व्यक्तीच्या पत्नीला ‘संजय गांधी निराधार योजना’, लहान मुलांसाठी ‘बाल संगोपन योजना’ आणि शासनाच्या ‘आपत्ती निवारण निधी’तून तातडीने आर्थिक साहाय्य मिळवून देण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा, अशी विनंती करण्यात आली आहे.
मा. आगार व्यवस्थापक कार्यालय (MSRTC), महाबळेश्वर: एसटी महामंडळाच्या आगार व्यवस्थापकांना दिलेल्या पत्रात मृत नरेश भोंडेकर यांच्या अंत्यसंस्कारासाठी व तातडीच्या घरगुती खर्चासाठी आगार पातळीवरून त्वरित रोख आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे. यासोबतच महामंडळाकडून त्रयस्थ व्यक्तीच्या (Third Party) मृत्यू पोटी मिळणाऱ्या सानुग्रह अनुदानाचा (Ex-Gratia) प्रस्ताव सातारा विभाग नियंत्रक कार्यालयाकडे जलद गतीने पाठवावा आणि मोटार अपघात न्यायप्राधिकरणाकडून (MACT) मिळणाऱ्या भरपाईसाठी आवश्यक ते सहकार्य व कागदपत्रे उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदन देताना उपस्थित पदाधिकारी:
प्रशासनाला ही पत्रे सुपूर्द करताना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) चे महाबळेश्वर तालुका अध्यक्ष जॉन जोसेफ, उद्योजक आघाडीचे जिल्हा अध्यक्ष मिथुन तळवलकर, महाबळेश्वर तालुका कार्याध्यक्ष पप्पू भोसले, महाबळेश्वर शहर अध्यक्ष विनय गायकवाड आणि प्रमुख कार्यकर्ते अंकुश कांबळे प्रामुख्याने उपस्थित होते.
”भोंडेकर कुटुंब अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत असून प्रशासनाने मानवी दृष्टिकोनातून या प्रकरणाचे गांभीर्य ओळखावे. पीडित कुटुंबाला जोपर्यंत शासकीय स्तरावरून पूर्ण न्याय आणि आर्थिक आधार मिळत नाही, तोपर्यंत पक्षाच्या वतीने हा पाठपुरावा सातत्याने सुरू राहील,” असा इशारा याप्रसंगी आरपीआय पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.





