संघटन सृजन अभियानाअंतर्गत फेरनिवड झाल्याबद्दल राजेंद्र भंडारी यांचा सत्कार
महाबळेश्वर : काँग्रेस पक्षाच्या वतीने देशभरात राबविण्यात आलेल्या संघटन सृजन अभियानाअंतर्गत महाबळेश्वर तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी श्री. राजेंद्र भंडारी यांची फेरनिवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल त्यांचा सत्कार वाई विधानसभा काँग्रेसचे युवा नेते जयदीप शिंदे यांच्या वतीने करण्यात आला.
देशभरात राबविण्यात आलेले संघटन सृजन अभियान महाराष्ट्रातही यशस्वीरीत्या पार पडले. या अभियानाअंतर्गत विविध संघटनात्मक फेररचना करण्यात आल्या असून, महाबळेश्वर तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी राजेंद्र भंडारी यांच्यावर पुन्हा एकदा जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
फेरनिवडीबद्दल आयोजित सत्कार समारंभात जयदीप शिंदे यांनी राजेंद्र भंडारी यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. महाबळेश्वर तालुक्यात काँग्रेस पक्ष अधिक बळकट करण्यासाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
नितीन वन्ने ,अजित मोरे, दिलीप सपकाळ,अशोक चव्हाण, जॉन जोसेफ, विशाल कांबळे संजय वन्ने समाज सेवक व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.





