दुर्गनादकडून पन्हाळा ते पावनखिंड ५२ किमीचा खडतर ट्रेक यशस्वीरित्या पूर्ण
छत्रपती शिवाजी महाराजांच्या विशाळगडाकडील सुटकेतील शौर्यगाथेची साक्ष असणाऱ्या पन्हाळगड ते पावनखिंड या ऐतिहासिक मार्गावर दुर्गनाद ट्रेकिंग अँड ॲडव्हेंचर,सातारा या संस्थेच्या वतीने आयोजित दोन दिवसीय ट्रेक यशस्वीरीत्या पार पडला. या संस्थेच्या ४० सहकाऱ्यांनी दोन दिवसात एकूण ५२ किमी अंतर पाऊलवाट,जंगल,ओढे,नदी नाले ओलांडत पायी चालत हा खडतर प्रवास पूर्ण केला.

हा ट्रेक शनिवारी पहाटे बाजीप्रभू देशपांडे आणि वीर शिवा काशिद यांचे स्मरण करून पन्हाळगड येथून सुरू झाली. ११ जुलै १६६० रोजी महाराज याच किल्ल्यात सिद्दीच्या वेढ्यात अडकले होते. या सर्व इतिहासाचे स्मरण करत आणि छत्रपतींच्या मावळ्यांचे बलिदान आणि त्याग जागवत या ट्रेकला सुरुवात झाली. पहिल्या दिवशी दुर्गनाद सहकाऱ्यांनी पन्हाळगड ते मसाई पठार ते आंबेवाडी असा सुमारे ३२ किमीचा टप्पा पार केला. रात्रीआंबेवाडी गावात मुक्काम करण्यात आला.
रविवारी पहाटे पुन्हा ट्रेकला सुरुवात होऊन घनदाट जंगल आणि डोंगररांगा ओलांडत पावनखिंड पर्यंतचा असा २० किमीचा टप्पा पूर्ण करण्यात आला. दुपारी पावनखिंडीत पोहोचताच सर्व सहकाऱ्यांनी बाजीप्रभू आणि फुलाजी देशपांडे तसेच बांदल सेनेच्या मावळ्यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी “जय भवानी जय शिवाजी” आणि “हर हर महादेव” च्या घोषणा देण्यात आल्या.
याबाबत बोलताना दुर्गनाद ट्रेकिंग अँड ॲडव्हेंचरचे संस्थापक श्री. गणेश शिंदे म्हणाले, “नवीन पिढीला इतिहास केवळ पुस्तकातून न देता प्रत्यक्ष अनुभवायला लावणे हा या ट्रेकचा मुख्य उद्देश आहे. पन्हाळा ते पावनखिंड हा मार्ग म्हणजे त्याग, निष्ठा आणि स्वराज्यासाठीच्या बलिदानाचे प्रतीक आहे.”
या ट्रेकमध्ये विजया कदम, नेहा गायकवाड, डॉ.मनिषा शिरोडकर, जागृती फाळके, सुप्रिया मोरे, आशा माने, शशिकला घोरपडे, उषा जगदाळे, शुभांगी भोसले, रेखा ताम्हाणे, संपदा घाटगे, प्रशांत साळुंखे, नयना साळुंखे, महेश कदम, धनश्री शिंदे, रेणू गवाणे, मंजुषा बारटक्के, वृद्धी बारटक्के, धनंजय भोसले, डॉ. विजय माने, प्रा.सूर्यकांत अदाटे, डॉ. कल्याण पवार, प्रशांत साळुंखे, सागर खोचरे, अवधूत गायकवाड, उर्मिला जाधव, रुचिरा कानिटकर, कोविद कानिटकर, डॉ.दीपक निकम, पारसमल पाडवी, आदित्य पाडवी, डॉ शुभांगी बुटे, रविराज भोसले, विकास कोरडे, बाबू पिटेकर, रुपाली कानिटकर, संतोष खामकर, सौ.सपना शिंदे या सातारा, कोल्हापूर, सांगली, पुणे येथील १८ ते ६७ वयोगटातील ट्रेकर्सनी सहभाग नोंदविला. संपूर्ण प्रवासात प्राथमिक उपचार, पाणी आणि खाद्याची व्यवस्था संस्थेमार्फत करण्यात आली होती.
गेल्या २० वर्षांपासून दुर्गनाद संस्था किल्ले संवर्धन, स्वच्छता मोहीम आणि ऐतिहासिक ट्रेकचे आयोजन करत आहे. अशा उपक्रमांमुळे पर्यटनाबरोबरच ऐतिहासिक वारशाचे जतन होण्यास मदत होते, असे मत सहभागींनी व्यक्त केले. या ट्रेकसाठी आनंदराव पोवार प्राचीन युद्धकला प्रशिक्षण संस्था, कोल्हापूर या संस्थेचे अध्यक्ष श्री. पंडित आनंदराव पोवार,उपाध्यक्ष गौरव डोंगरे, श्री.विक्रम शिंदे, सौ.सुप्रिया शिंदे यांचे सहकार्य लाभले.
यावेळी हा खडतर ट्रेक पूर्ण केल्याबद्दल सहभागी ट्रेकर्सना सहभाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. अशा प्रकाराचे खडतर ट्रेक यशस्वीपणे पूर्ण करणारी दुर्गनाद ही सातारामधील पहिलीच ट्रेक संस्था आहे.




