साताऱ्यात २४ व्या इंटरनॅशनल येझदी–जावा डेचे जल्लोषात आयोजन; खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते उद्घाटन

सातारा, प्रतिनिधी : Yezdi Jawa Owners Club Maharashtra यांच्या वतीने कास, सातारा येथे आयोजित करण्यात आलेल्या २४ व्या इंटरनॅशनल येझदी–जावा डे कार्यक्रमाचे उद्घाटन खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या शुभहस्ते उत्साहात पार पडले.
यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांनी महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातून आलेल्या मोटारसायकलप्रेमींशी संवाद साधला. मोटारसायकल हा केवळ प्रवासाचे साधन नसून इतिहास, परंपरा आणि जिव्हाळा जपणारी संस्कृती असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
या कार्यक्रमात १९५६ सालापासूनच्या दुर्मिळ, विंटेज आणि ऐतिहासिक येझदी–जावा मोटारसायकलींचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. या मोटारसायकलींची पाहणी करताना त्यामागील जतन, मेहनत आणि समर्पणाची दखल खासदार उदयनराजे भोसले यांनी घेतली.
महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, इस्लामपूर, पुणे, मुंबई, बारामती तसेच कर्नाटक राज्यातून तब्बल १५० हून अधिक क्लासिक येझदी–जावा मोटारसायकली या सोहळ्यात सहभागी झाल्या होत्या. प्रत्येक मोटारसायकल आपल्या काळातील उत्कृष्ट अभियांत्रिकी, गुणवत्ता आणि समृद्ध वारशाची साक्ष देत होती.
अशा उपक्रमांमुळे विंटेज वाहनांचा वारसा जतन होण्याबरोबरच नव्या पिढीला भारतीय मोटारसायकल संस्कृतीचा इतिहास समजण्यास मदत होत असल्याचे मत खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले. तसेच या उपक्रमाचे आयोजन करणाऱ्या Yezdi Jawa Owners Club Maharashtra चे अभिनंदन करून सर्व सहभागी रायडर्सना शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी प्रसिद्ध ऑटोमोबाईल पत्रकार श्री. आदिल जल दारुखानावाला, श्री. यशराज पाटील, श्री. समीर मकानदार, श्री. सनी भोसले, श्री. शेखर चव्हाण, श्री. रोहित लाड, श्री. अमोल पाटुकले तसेच मोठ्या संख्येने सहभागी रायडर्स उपस्थित होते.




