पोवई नाका ते बॉम्बे रेस्टॉरंट चौक वाहतुक मार्गात बदल
सातारा : सातारा शहर नगरपरिषद हद्दीतील पोवई नाका ते बॉम्बे रेस्टॉरंट चौक जाणाऱ्या सार्वजनिक रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे काम ठेकेदारामार्फत चालू आहे. या रस्त्यावरून दररोज रा.प. महामंडळाच्या एस.टी बसेस, इतर सर्व प्रकारची अवजड वाहने त्याचप्रमाणे दुचाकी, चारचाकी वाहने येजा करीत असतात. सदर रस्त्याच्या दुभाजका पलीकडील एकच मार्गिका वाहतुकीसाठी उपलब्ध आहे. त्यामुळे एकाच मार्गिकेतून वाहनांची ये-जा असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी होत आहे. त्या अनुषंगाने रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत पोवई नाका ते बॉम्बे रेस्टॉरंट चौक व बॉम्बे रेस्टॉरंट चौक ते पोवई नाका जाणाऱ्या रस्त्यावरची वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येत आहे. यासाठी दि. 10 जुलै 2026 रोजीचे मध्यरात्रीपासून ते दि.30 सप्टेंबर २०२६ रोजीचे २३.५९ वा पर्यंत खालीलप्रमाणे वाहतुकीत बदल करीत असल्याचे पोलीस अधीक्षक निखील पिंगळे यांनी कळविले आहे.
अवजड वाहनांकरीता बंदी घालण्यात येणारे मार्ग पुढीलप्रमाणे. पोवई नाका ते बॉम्बे रेस्टॉरंट चौक या मार्गावरून जाणाऱ्या सर्व एस.टी. बसेस तसेच इतर अवजड वाहनांना जसे की, ट्रक, डंपर, कंटेनर, ट्रॅक्टर, माल वाहतुक करणारी वाहने यांना प्रवेश बंद करणेत येत आहे. बॉम्बे रेस्टॉरंट चौक ते पोवई नाका या मार्गावर येणारे सर्व एस.टी बसेस तसेच इतर अवजड वाहनांना जसे की, ट्रक, डंपर, कंटेनर, ट्रॅक्टर, माल वाहतुक करणारी वाहने यांना प्रवेश बंद करणेत येत आहे.
वाहतुकीकरीता पर्यायी मार्ग पुढीलप्रमाणे. सातारा मध्यवती बसस्थानका मधुन राज्य परिवहन महामंडळाच्या मुंबई, पुणे, कोरेगांव, सोलापुर बाजुकडे जाणा-या सर्व एस टी बसेस तसेच अवजड वाहने ट्रक, डंपर, कंटेनर, ट्रॅक्टर इतर मालवाहतुक करणारी वाहने ही जुनी जिल्हा मध्यवती बँक, पोलीस परेड मैदान, पारंगे चौक जुना.आर.टी.ओ चौक वाढे फाटा या मार्ग सातारा शहरातुन बाहेर पडतील. सातारा मध्यवर्ती बसस्थानका मधुन राज्य परिवहन महामंडळाच्या मुंबई, पुणे, कोरेगांव, सोलापुर बाजुकडुन सातारा शहरात प्रवेश करणाऱ्या सर्व एस.टी बसेस तसेच अवजड वाहने ट्रक, डंपर, कंटेनर, ट्रॅक्टर इतर मालवाहतुक करणारी वाहने ही वाढे फाटा जुना आर.टी. ओ चौक पारंगे चौक मार्ग सातारा एस.टी स्टँड, सातारा शहरा मध्ये प्रवेश करतील. पोवई नाका ते बॉम्बे रेस्टॉरंट चौक व बॉम्बे रेस्टॉरंट चौक ते पोवई नाका जाणाऱ्या व येणाऱ्या मार्गांवर फक्त दुचाकी, चारचाकी वाहने, शाळेच्या बसेस, कार, ऑटो रिक्षा, रूग्णवाहीका, पोलीस वाहने, अग्निशामक दलाची वाहने यांनाच प्रवेश देण्यात येत आहे.





