साताऱ्याच्या मातीतील ‘७/१२ प्रेमाचा’ या वेबसिरीजला उत्स्फूर्त प्रतिसाद
मराठी मनोरंजन विश्वात ग्रामीण जीवनाचा अस्सल गंध, निसर्गावरील अपार प्रेम, शेतीची वेदना, नात्यांची उब आणि रहस्याची उत्कंठा यांचा सुंदर मिलाफ घडवणारी ‘७/१२ प्रेमाचा’ ही वेब सिरीज प्रेक्षकांच्या भेटीला आलेली असून या वेबसिरीजला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
BDC 4 स्टुडिओ प्रस्तुत, अशोक एन जे निर्मित आणि करण मनोज अहिरे लिखित-दिग्दर्शित या वेबसिरीजचा पहिला भाग ४ जुलै रोजी प्रदर्शित झाला असून या मालिकेचे उर्वरित भाग दर शनिवारी सायंकाळी ७ वाजता प्रदर्शित होणार आहेत. ‘७/१२ प्रेमाचा’ यामध्ये जमिनीच्या ७/१२ उताऱ्यावर मालकीची नोंद होते. पण माणसांच्या मनावर प्रेमाची नोंद होते. त्या प्रेमाची, संघर्षाची, निसर्गाची आणि मातीशी असलेल्या नात्याची हृदयस्पर्शी कहाणी म्हणजे हि वेब सिरीज आहे.
आजच्या डिजिटल युगात गाव, शेती, शेतकरी आणि मातीशी जोडलेल्या भावविश्वावर आधारित कथा क्वचितच पाहायला मिळतात. अशा काळात ‘७/१२ प्रेमाचा’ ही वेब सिरीज केवळ प्रेमकथा सांगत नाही, तर ती शेतकऱ्याच्या आयुष्याचा संघर्ष, निसर्गाशी असलेले अतूट नाते, कुटुंबव्यवस्थेतील मुल्ये, सामाजिक वास्तव आणि मानवी भावनांचा सखोल वेध घेते. साताऱ्याच्या निसर्गरम्य परिसरात चित्रीत झालेली ही कथा प्रत्येक मराठी माणसाला आपल्या मातीची आठवण करून देणारी आहे.
याबाबत लेखक व दिग्दर्शक करण अहिरे म्हणाले, ‘७/१२ प्रेमाचा’ ही फक्त वेबसिरीज नाही तर ती आमच्या मातीला, शेतकऱ्याला, निसर्गाला आणि मानवी नात्यांना वाहिलेली एक आदरांजली आहे. मनोरंजनासोबतच समाजात सकारात्मक विचार आणि संवेदनशीलता रुजवण्याचा आमचा प्रयत्न आहे. यातील प्रत्येक भाग प्रेक्षकांना भावनिक, विचारप्रवर्तक आणि उत्कंठावर्धक अनुभव देईल, असा आम्हाला विश्वास आहे.’
या वेबसिरीजचे निर्माते अशोक एन. जे. (संस्थापक – EFL) हे एक निसर्गप्रेमी पर्यावरणतज्ञ असून त्यांनी आजवर पूर्ण आयुष्य हे निसर्गासाठी वाहिलेले आहे. त्यांचे विचार आम्ही या वेबसिरीजच्या माध्यमातून मांडायचा प्रयत्न केला आहे. दिपक पवार यांनी यातील छायांकन, गीत, संगीत आणि संकलनाची धुरा सुरेखपणे सांभाळली आहे. प्रतिक्षा अहिरे यांनी वेशभूषा, करण अहिरे यांनी कार्यकारी निर्माता, ऋषिकेश वावरे यांनी सहाय्यक दिग्दर्शक, तर राहुल मोरे यांनी प्रसिद्धीप्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडली आहे.
प्रोडक्शन सहाय्याची धुरा नुतन नाईक, तेजस ओंबळे, कुणाल अहिरे आणि राजेश ओंबळे यांनी सांभाळली आहे. या वेबसिरीजमध्ये केतकी गावडे, राहुल मोरे, ऋषिकेश वावरे, कुमुदिनी अदाटे, सुनिल शेटे, करण अहिरे, कमलाकर डोईफोडे, तन्वी ओंबळे, तेजस ओंबळे, कुणाल अहिरे, प्रविण अहिरे, सुधा घोडके, आण्णा नायडू यांनी आपल्या प्रभावी अभिनयातून कथेला जिवंतपणा दिला आहे.
ही वेबसिरीज करताना नगरसेविका मुक्ता लेवे, श्री.मनोज अहिरे, श्री.यशवंत ओंबळे, अभिनेते श्री. बाळकृष्ण शिंदे, सागरशेठ कापसे, अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचे संचालक नामदेव सावंत, संभाजी इंदलकर, सातारा पंचायत समितीचे सभापती संभाजी अहिरे, देविदास अहिरे, विठ्ठल सावंत, तुकाराम ओंबळे, गणी धनावडे यांचे सहकार्य लाभले. तसेच या वेबसिरीजचे चित्रीकरण सातारा तसेच मेढा परिसरातील अहिरेवाडी, जोतिबाचीवाडी, आगुंडेवाडी, गोगावलेवाडी, चिंचणी या गावाबरोबरच इको फ्रेंडली लाईफ सेंटर शक्तीस्थळ प्रेरणास्थान म्हसा मुरबाड, ठाणे येथेदेखील या वेबसिरीजचे चित्रीकरण करण्यात आले.
‘७/१२ प्रेमाचा’ ही वेबसिरीज मनोरंजनाबरोबर ग्रामीण महाराष्ट्राचा आत्मा, शेतकऱ्याचं जगणे, निसर्ग संवर्धनाची जाणीव, प्रेमातील निस्वार्थपणा आणि नात्यांमधील विश्वास यांचे जतन करणारा एक कलाविष्कार आहे. प्रत्येक भागासोबत नवे रहस्य, नवी भावना आणि नवा विचार प्रेक्षकांसमोर उलगडत जाणार आहे. त्यामुळे ग्रामीण महाराष्ट्राच्या अस्सल जीवनाला पडद्यावर साकारण्याचा हा प्रयत्न मराठी प्रेक्षकांच्या मनात निश्चितच वेगळे स्थान निर्माण करेल, असा विश्वास संपूर्ण टीमने व्यक्त केला आहे. दर शनिवारी सायंकाळी ७ वाजता ‘७/१२ प्रेमाचा’चा नवा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून मराठी वेबविश्वात ही मालिका एक वेगळी ओळख निर्माण करेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.





