त्रिपुटीत स्वखर्चाने ५० हून अधिक देशी वृक्षांची लागवड; वनविभागाच्या परवानगीनंतर बोभाटे कुटुंबाचा पर्यावरण संवर्धनाचा उपक्रम
कोरेगाव : पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत त्रिपुटी (ता. कोरेगाव) येथील श्री. दिपक विश्वनाथ बोभाटे यांनी आपल्या कुटुंबासह स्वखर्चाने ५० हून अधिक देशी वृक्षांची लागवड केली. कोरेगाव वनविभागाचे माननीय श्री. गायकवाड यांच्या लेखी परवानगीनंतर हा उपक्रम वनक्षेत्रात राबविण्यात आला.
मुसळधार पाऊस सुरू असतानाही श्री. बोभाटे, त्यांची पत्नी, दोन्ही मुले आणि माजी बिनविरोध उपसरपंच श्री. विश्वनाथ बोभाटे यांच्या मार्गदर्शनाखाली वड, पिंपळ, निंब, चिंच, उंबर, आवळा, सोनचाफा तसेच इतर देशी प्रजातींच्या ५० हून अधिक रोपांची लागवड करण्यात आली.
काही महिन्यांपूर्वी या परिसरात लागलेल्या भीषण वणव्यामुळे अनेक लहान-मोठी झाडे जळून खाक झाली होती. त्यानंतर हा परिसर पुन्हा हिरवागार करण्याचा संकल्प करण्यात आला. ज्या ठिकाणी झाडे जळून गेली होती, त्या जागेची साफसफाई करून त्याच खड्ड्यांमध्ये दोन ते तीन वर्षे वयाची नवीन रोपे लावण्यात आली.
या उपक्रमासाठी कोणत्याही प्रकारचे अनुदान किंवा आर्थिक मदत न घेता सर्व खर्च स्वतः उचलण्यात आल्याचे श्री. दिपक बोभाटे यांनी सांगितले. पर्यावरणाचे रक्षण ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याच्या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.
वृक्षारोपणानंतर परिसराची पाहणी केली असता अनेक ठिकाणी अजूनही जळालेल्या झाडांचे अवशेष आणि रिकामे खड्डे असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे आगामी काळातही स्वखर्चाने आणखी देशी वृक्षांची लागवड करून संपूर्ण परिसर हिरवागार करण्याचा संकल्प बोभाटे कुटुंबाने व्यक्त केला आहे.
मुसळधार पावसामुळे या उपक्रमाचे छायाचित्र घेता आले नसले, तरी निसर्गाच्या साक्षीने केलेले हे कार्यच सर्वात मोठा सन्मान असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
यावेळी कोरेगाव वनविभागाचे वनक्षेत्रपाल जगदाळे सर, वनपाल लटके सर, श्री. गायकवाड सर यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल व परवानगीबद्दल श्री. दिपक विश्वनाथ बोभाटे यांनी मनःपूर्वक आभार मानले. तसेच प्रत्येक नागरिकाने वर्षातून किमान एक तरी झाड लावून ते जगवावे, असे आवाहनही त्यांनी केले.





