मिरचीपूड टाकून मटण व्यापाऱ्याला लुटणाऱ्या आरोपीला सातारा न्यायालयाकडून कारावास आणि २६ हजारांचा दंड
रहिमतपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत व्यापाऱ्याच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून, लाकडी दांडक्याने मारहाण करत रोख रकमेसह मोबाईलची जबरी चोरी करणाऱ्या आरोपीला सातारा जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषी ठरवले आहे. माननीय जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. एस. आर. तांबोळी यांनी आरोपीला १ महिना साधी कैद आणि २६,००० रुपये दंडाची कायदेशीर शिक्षा ठोठावली आहे.

गुन्ह्याची पार्श्वभूमी:
दिनांक ११/१०/२०२० रोजी संध्याकाळी ६:३० वाजण्याच्या सुमारास, फिर्यादी फिरोज महमद कसाई (वय ४० वर्षे, व्यवसाय: मटण शॉप, रा. रहिमतपूर, ता. कोरेगाव) हे ‘चौकीचा आंबा’ येथील आपले दुकान बंद करून मोटारसायकलवरून रहिमतपूरकडे निघाले होते. संध्याकाळी ६:४५ च्या सुमारास अंभेरी घाटातून खाली उतरत असताना, घाटाच्या शेवटच्या वळणावर आरोपी विशाल कैलास पाटोळे (वय २३ वर्षे, रा. एस.टी. स्टँड शेजारी, औंध, ता. खटाव) याने फिर्यादीची गाडी अडवली. आरोपीने फिर्यादीच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून, त्यांना ओढत झाडीत नेले आणि लाकडी दांडक्याने तसेच लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. आरोपीने फिर्यादीजवळील रोख रक्कम, सॅमसंग कंपनीचा मोबाईल आणि आधारकार्ड असा एकूण रु. ३५,२००/- चा माल जबरदस्तीने लुटून नेला होता. या संदर्भात रहिमतपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपास आणि न्यायालयीन कामकाज:
सदर गुन्ह्याचा सखोल तपास करून रहिमतपूर पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक श्री. घनश्याम बल्लाळ यांनी माननीय न्यायालयात दोषारोपपत्र (Charge Sheet) सादर केले होते.
हा खटला माननीय जिल्हा व सत्र न्यायाधीश (DJ-२) श्री. एस. आर. तांबोळी यांच्या न्यायालयात चालला. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी अभियोक्ता श्रीमती अनुराधा शंकरराव निंबाळकर यांनी प्रभावीपणे बाजू मांडली. या खटल्यात एकूण १२ साक्षीदार तपासण्यात आले. परिस्थितीजन्य पुरावा, साक्षीदारांची साक्ष आणि सरकारी वकिलांचा मजबूत युक्तिवाद तसेच माननीय उच्च व सर्वोच्च न्यायालयाचे विविध न्यायनिवाडे विचारात घेऊन, न्यायालयाने आरोपी विशाल कैलास पाटोळे याला भा.द.वि. कलम ४११ अन्वये १ महिना साधी कैद आणि २६,०००/- रुपये दंड, व दंड न भरल्यास ६ महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली.
वरिष्ठांचे मार्गदर्शन व मोलाची कामगिरी:
सदर कामगिरी सातारा जिल्ह्याचे माननीय पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे सो, अप्पर पोलीस अधीक्षक मा. डॉ. वैशाली कडूकर मॅडम, कोरेगाव विभागाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती राजश्री तेरणी मॅडम, आणि रहिमतपूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. विनोद नेवसे यांच्या मोलाच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या खटल्यात रहिमतपूर पोलीस स्टेशनचे पैरवी अधिकारी पोलीस कॉन्स्टेबल विनोद मोरे यांनी उत्तम पैरवी करत न्यायालयीन कामकाजात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.




