‘हिंदवी’च्या विद्यार्थ्याला भारत सरकारचे डिझाईन पेटंट
सातारा : येथील हिंदवी पब्लिक स्कूलच्या पंचकोशाधारित गुरुकुलचा विद्यार्थी आकल्प कुलकर्णी याने प्लॅस्टिक कचऱ्याच्या पर्यावरणपूरक व्यवस्थापनासाठी विकसित केलेल्या अभिनव संकल्पनेला भारत सरकारचे डिझाईन पेटंट मिळाले आहे.
इयत्ता सातवीत शिकणाऱ्या आकल्प याने गावाबाहेरील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात विखुरलेल्या प्लॅस्टिक कचऱ्याचे निरीक्षण करताना निर्माण झालेल्या प्रश्नातून या संशोधनाची सुरुवात केली. सार्वजनिक ठिकाणी निर्माण होणारा हलक्या वजनाचा प्लॅस्टिक कचरा त्याच ठिकाणी संकुचित करून घनाकार स्वरूपात तयार करणाऱ्या स्मार्ट डस्टबिनची संकल्पना आकल्पने मांडली. यामुळे प्लॅस्टिक कचरा उडणे, नाले तुंबणे, जनावरांकडून प्लॅस्टिक खाल्ले जाणे आणि कचऱ्याच्या वाहतुकीतील अडचणी कमी होण्यास मदत होणार आहे.
या संकल्पनेच्या विकासासाठी आकल्पचे वडील रोहित कुलकर्णी यांनी तांत्रिक मार्गदर्शन केले. बौद्धिक संपदा सल्लागार किशोर शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली डिझाईन पेटंटसाठी अर्ज करण्यात आला. आवश्यक तांत्रिक व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर भारत सरकारने या अभिनव डिझाईनला मान्यता दिली. आकल्पच्या या यशामागे हिंदवी पंचकोशाधारित गुरुकुलात दिले जाणारे संशोधनाभिमुख शिक्षण, पर्यावरण संवर्धनाचे संस्कार आणि सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव यांचा मोठा वाटा असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. श्रीनिधी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अमित कुलकर्णी, गुरुकुलच्या कार्यकारी संचालिका रमणी कुलकर्णी, हिंदवी पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका ज्योती सुपेकर, उपमुख्याध्यापिका शिल्पा पाटील, गुरुकुल प्रमुख प्रसाद जोशी यांनी आकल्पचे अभिनंदन केले.





