धनीच्या बागेलगताचा ओढा स्वच्छतेच्या प्रतीक्षेत तुंबलेल्या ओढात जीवजंतूचा फैलाव. नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न उभा.
सातारा-शिवम कॉलनी गडकर आळी येथील धनीच्या बागेलगतचा असलेला ओढा सध्या स्वच्छतेच्या प्रतीक्षेत आहे. हा ओढा पूर्णपणे तुंबलेला असून पाण्याचा प्रवाह पूर्णपणे थांबलेला आहे. त्यामुळे येथील पाणी दूषित झाले असून जीवजंतूचा मोठ्या प्रमाणात फैलाव झाला आहे. परिसरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हे धोकादायक असून नगरपालिका प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन या ओढ्याची स्वच्छता करावी अशी नागरिकांची मागणी आहे. तुंबलेल्या या ओढ्यात मोठ्या प्रमाणात वाढलेली झाडे झुडपे तसेच प्लास्टिक पिशव्यांचा खच पडल्याने पाण्याचा प्रवाह पूर्णपणे थांबलेला आहे.
त्यात रासायनिक मिश्रणांची भर पडल्याने येथील पाणी दूषित व दुर्गंधीमय झाले आहे. ओढ्याच्या स्वच्छतेबाबत संबंधित यंत्रणेला वेळोवेळी सूचना देण्यात आलेल्या आहेत. मध्यंतरी या ओढ्याचे स्वच्छतेसाठी या भागातील नगरसेविका भारती किशोर शिंदे यांनी पुढाकार घेतला होता. त्यावेळी नगरपालिका प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद देत या ओढ्याची स्वच्छता बाबत जेसीबीच्या साह्याने काही भाग स्वच्छ केला होता. अद्याप ओढ्यातील उर्वरित भागाचे काम बाकी आहे. पावसाळ्यापूर्वी या ओढ्याची स्वच्छता व्हावी अशी मागणी आता नागरिकांमधून जोर धरू लागली आहे.
शिवम कॉलनीतील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने तुंबलेला ओढा धोकादायक ठरू पाहत आहे. पावसाळ्यापूर्वी ओढे नाले स्वच्छता करण्याचे शिवधनुष्य सातारा नगरपालिकेने हाती घेतले आहे. त्याची अंमलबजावणी व्हावी हीच अपेक्षा आहे. माजी उपनगराध्यक्ष किशोर शिंदे याबाबत सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. तुंबलेल्या ओढ्यात वाढलेली झाडे झुडपे पाण्याच्या प्रवाहाला अडथळा ठरत आहेत.

श्रीरंग काटेकर सातारा.




