नेस्ले इंडिया प्रणित हिलदारी अभियानांतर्गत महाबळेश्वर परिसरात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन
महाबळेश्वर:पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती निर्माण करणे आणि पर्यावरण संवर्धनासाठी सामूहिक कृतीला प्रोत्साहन देणे या उद्देशाने दरवर्षी ५ जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने नेस्ले इंडिया प्रणित हिलदारी अभियानांतर्गत महाबळेश्वर क्लस्टरमध्ये विविध पर्यावरणपूरक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
या उपक्रमांमध्ये महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषद, वनविभाग महाबळेश्वर, ग्रामपंचायत मेटगुताड, ग्रामपंचायत क्षेत्र महाबळेश्वर तसेच पंचायत समिती महाबळेश्वर यांनी सक्रिय सहभाग घेतला.
स्वच्छता अभियान
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महाबळेश्वर परिसरातील विविध ठिकाणी एकूण चार स्वच्छता अभियान राबविण्यात आली. ग्रामपंचायत मेटगुताड यांच्या सहकार्याने पांचगणी–महाबळेश्वर मुख्य रस्ता, वनविभागाच्या सहकार्याने वेण्णा लेक परिसर, पंचायत समिती महाबळेश्वर यांच्या सहकार्याने पंचायत समिती कार्यालय व बाहेरील परिसर तसेच सेठ गंगाधर माखरिया हायस्कूल यांच्या सहकार्याने शाळा व आठवडी बाजार परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमांमध्ये एकूण २७० नागरिकांनी सहभाग नोंदविला. मोहिमेदरम्यान सुमारे २१९.५५ किलो सुका कचरा संकलित करण्यात आला.
वृक्षारोपण कार्यक्रम
पर्यावरण संवर्धनाच्या उद्देशाने तीन ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. ग्रामपंचायत मेटगुताड यांच्या सहकार्याने जयश्री फिरोदिया पॉईंट येथे, वनविभागाच्या सहकार्याने हिरडा नाका परिसरात तसेच सेठ गंगाधर माखरिया हायस्कूलच्या परिसरात एकूण ७५ वृक्षांची लागवड करण्यात आली.
स्वच्छता फेरी
ग्रामपंचायत क्षेत्र महाबळेश्वर यांच्या सहकार्याने क्षेत्र महाबळेश्वर येथे स्वच्छता फेरीचे आयोजन करण्यात आले. या फेरीत जिल्हा परिषद शाळा, क्षेत्र महाबळेश्वर येथील ६९ विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचे महत्त्व सांगणारे संदेश देत परिसरात जनजागृती केली.
या विविध उपक्रमांमध्ये सातारा वनविभागाचे उपवनसंरक्षक श्री. अमोल सातपुते, सहायक वनसंरक्षक श्री. प्रदीप रौधळ, वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. महादेव मोहिते, महाबळेश्वर पोलीस निरीक्षक श्री. बापूसाहेब सांडभोर, वनपरिमंडळ अधिकारी श्री. सुनील लांडगे, पंचायत समिती महाबळेश्वरच्या सभापती श्रीमती. शकुंतला चोरमले, गटविकास अधिकारी श्री. विजय विभुते, ग्रामविकास अधिकारी श्री. प्रशांत रणपिसे, मेटगुताड ग्रामपंचायतीचे सरपंच श्री. भिकन बावळेकर, ग्रामविकास अधिकारी श्री. वैभव काळे, महाबळेश्वर हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष श्री. प्रल्हाद राठी, उपाध्यक्ष श्री. मनीष तेजानी, सचिव श्री. रमेश कौल, गर्ल्स युथच्या संस्थापक श्रीमती वैशाली चौरसिया, संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. विजय भिलारे आदी मान्यवर उपस्थित होते.
याशिवाय वनविभाग, पंचायत समिती, ग्रामपंचायती यांच्या विविध विभागांचे अधिकारी व पदाधिकारी महाबळेश्वरमधील विविध सामाजिक संस्था, जिल्हा परिषद केंद्र शाळा मेटगुताड, जिल्हा परिषद शाळा श्री. क्षेत्रमहाबळेश्वर, शेठ गंगाधर माखारीया हायस्कूल महाबळेश्वर येथील विद्यार्थी व शिक्षक, महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषद व वनविभाग येथील स्वच्छता कर्मचारी यांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
महाबळेश्वरसारख्या पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील आणि पर्यटनप्रधान क्षेत्रात अशा प्रकारचे उपक्रम सातत्याने राबविण्याची आवश्यकता असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. विविध शासकीय विभाग, स्वयंसेवी संस्था आणि स्थानिक संघटनांनी एकत्रितपणे काम केल्यास महाबळेश्वर हे देशातील सर्वात स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक पर्यटनस्थळ म्हणून निश्चितच नावारूपास येईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.




