जोसेफ विजय फ्लोअर टेस्टमध्येही पास! तमिळनाडू विधानसभेत विश्वासदर्शक ठराव बहुमताने जिंकले
तमिळनाडू विधानसभेत बुधवारी झालेल्या विश्वासदर्शक ठरावादरम्यान तमिळगा वेत्री कळघम सरकारला १४४ आमदारांचं पाठबळ मिळालं. फ्लोअर टेस्टच्या कामकाजादरम्यान काँग्रेस, सीपीआय(एम), व्हीसीके आणि इंडियन युनियन मुस्लिम लीग (आययूएमएल) यांनी विजय यांच्या नेतृत्वाखालील सरकारला पाठिंबा दिला. तर, AIADMK च्या बंडखोर आमदारांनीही विजय यांना पाठिंबा दिला आहे.
काँग्रेसने आपल्या पाच आमदारांसह सरकारला पाठिंबा दिला, तर सीपीआय(एम), व्हीसीके आणि आययूएमएल या पक्षांच्या प्रत्येकी दोन आमदारांनीही समर्थन दिलं.
अम्मा मक्कल मुन्नेत्र कळघम मधून हकालपट्टी झालेले आमदार एस कामराज यांनीही सरकारच्या बाजूने मतदान केले, परिणामी युतीचे संख्याबळ १२० जागांवर पोहोचले. हे विधानसभेतील बहुमताच्या आकड्यापेक्षा खूप जास्त आहे. तर, ‘बंडखोर’ नेते षन्मुगम आणि एसपी वेळुमणी यांच्या नेतृत्वाखालील अण्णाद्रमुक (AIADMK) पक्षातील ४७ पैकी किमान २५ आमदारांनी मुख्यमंत्र्यांच्या बाजूने मतदान केले.
तमिळनाडू विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर, मुख्यमंत्री विजय यांनी सभागृहाला संबोधित केले आणि फ्लोअर टेस्टदरम्यान तमिळगा वेत्री कळघम (TVK) सरकारला पाठिंबा देणाऱ्या सर्व पक्षांचे आणि आमदारांचे आभार मानले. या युतीला “मक्कल युती” (जनतेची युती) असे संबोधून विजय यांनी ठामपणे सांगितले की, त्यांचे सरकार जातीय राजकारणाने प्रेरित नाही आणि समाजातील प्रत्येक घटकासाठी काम करेल. हे सरकार केवळ त्यांना मतदान करणाऱ्यांचेच नाही, तर निवडणुकीत त्यांना विरोध करणाऱ्यांचेही आहे. टीव्हीके सरकार सुशासनावर लक्ष केंद्रित करेल आणि तमिळनाडूतील जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करेल”
विधानसभेत जेव्हा एसपी वेळुमणी बोलण्यासाठी उभे राहिले, तेव्हा ईपीएस गटाच्या सदस्यांनी तीव्र आक्षेप घेतला, यामुळे सभागृहात निदर्शने झाली. मात्र, सभापतींनी वेळुमणी यांना बोलणे सुरू ठेवण्याची परवानगी दिली. त्यानंतर वेळुमणी यांनी एक राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण वक्तव्य केले, ज्याने अण्णाद्रमुकमधील फुटीवर शिक्कामोर्तब केले. “आम्ही जनमताचाआदर करतो”, असं ते म्हणाले. त्यामुळे त्यांनी विजय यांना अप्रत्यक्ष पाठिंबा दिल्याचं स्पष्ट होतंय.



