आयटी पार्कसाठी ४२.५५ हे.आर जमीन एमआयडीसीकडे वर्ग ना. शिवेंद्रसिंहराजेंच्या प्रयत्नांना मोठे यश; नागेवाडी येथे आयटी पार्क उभारणीचा मार्ग मोकळा
सातारा- सातारा जिल्ह्यातील युवकांना साताऱ्यातच रोजगाराची संधी मिळावी यासाठी सातारा जिल्ह्यात आयटी पार्क व्हावे, यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा करणारे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रयत्नांना आज मोठे यश मिळाले आहे. नागेवाडी ता. सातारा येथील ४२ हेक्टर ५५ आर एवढी शासकीय जमीन आयटी पार्क उभारण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) यांच्याकडे वर्ग करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला, त्यामुळे सातारा जिल्ह्यात आयटी पार्क उभारणीचा मार्ग आता मोकळा झाला असून हा महत्वपूर्ण निर्णय घेतल्याबद्दल ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांचे आभार मानले आहेत.
सातारा जिल्ह्यातील आयटी क्षेत्राशी निगडीत इंजिनियर्स आणि युवक व युवतींना साताऱ्यातच रोजगाराची संधी मिळाली पाहिजे, येथील युवकांना पुणे, मुंबई यासह अन्य राज्यातील शहरात नोकरीसाठी जावे लागू नये यासाठी सातारा तालुक्यातील नागेवाडी (लिंब खिंड) येथील शासकीय जागेत आयटी पार्क उभारण्यात यावा, यासाठी ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी अभ्यासपूर्ण पाठपुरावा सुरु केला होता. ना. शिवेंद्रसिंहराजे यांच्या सूचनेनुसार काही दिवसांपूर्वीच सदर जागेची पाहणी एमआयडीसी विभागामार्फत करण्यात आली होती. ना. शिवेंद्रसिंहराजे यांच्या मागणीनुसार महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागामार्फत नागेवाडी येथील गट नं. ३०८/१ येथील ४२ हेक्टर ५५ आर एवढे क्षेत्र आयटी पार्कसाठी आरक्षित करण्यात आले होते. आयटी पार्क विकसित करण्याचे काम प्रत्यक्ष सुरु होण्यासाठी सदरची जागा महसूल विभागाकडून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे वर्ग करणे आवश्यक होते. यासाठी ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा पाठपुरावा सुरु होता.
ना. शिवेंद्रसिंहराजे यांच्या मागणीनुसार आज मुंबई येथे मंत्रालयात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नागेवाडी येथील ४२ हेक्टर ५५ आर एवढे शासकीय क्षेत्र आयटी पार्क विकसित करण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळास प्रदान करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तशी मान्यता राज्याच्या महसूल विभागाने दिली आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यात आयटी पार्क उभारणीचा मार्ग मोकळा झाला असून लवकरच पुढील कार्यवाही गतीने केली जाणार आहे. पुढील कार्यवाही गतीने होण्यासाठी आवश्यक त्या सूचना ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या आहेत. दरम्यान, ४२ हेक्टर ५५ आर एवढे शासकीय क्षेत्र आयटी पार्क विकसित करण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळास प्राप्त झाल्याने खऱ्या अर्थाने आयटी पार्क उभारणीस चालना मिळाली असून जिल्हावासियांमधून समाधान व्यक्त होत आहे.




