वयाच्या चाळिशीनंतर हाडं दणकट ठेवण्यासाठी ५ कॅल्शियमयुक्त पदार्थांचा आहारात समावेश आवश्यक
सातारा : वय वाढत जाईल तसे शरीरात विविध बदल होऊ लागतात. विशेषतः चाळिशीनंतर हाडांची घनता कमी होण्याची प्रक्रिया वेगाने सुरू होते. महिलांमध्ये हा बदल अधिक लवकर दिसून येतो. त्यामुळे हाडं ठिसूळ होण्याचा धोका वाढतो. साध्या हालचालींमध्येही गुडघे, कंबर यामध्ये कटकट आवाज येणे, तसेच पडल्यास फ्रॅक्चर होण्याची शक्यता वाढते.
तज्ञांच्या मते, हाडे मजबूत ठेवण्यासाठी कॅल्शियम अत्यंत महत्त्वाचे असते. औषधांवर अवलंबून राहण्यापेक्षा नैसर्गिक आहारातून कॅल्शियम घेतल्यास अधिक चांगले परिणाम दिसून येतात. रोजच्या आहारात काही कॅल्शियमयुक्त पदार्थांचा समावेश केल्यास हाडांची मजबुती टिकवता येते.
हे ५ पदार्थ ठरतात हाडांसाठी लाभदायक :
१. नाचणी :
नाचणी ही कॅल्शियमचा उत्तम स्त्रोत मानली जाते. १०० ग्रॅम नाचणीत सुमारे ३४४ मिग्रॅ कॅल्शियम असते. आठवड्यातून २ ते ३ वेळा नाचणीची भाकरी, आंबील किंवा लाडू खाल्ल्यास हाडांचा ठिसूळपणा कमी होतो.
२. दूध व दुग्धजन्य पदार्थ :
दूध, दही यामध्ये भरपूर कॅल्शियम असते. दह्यातील प्रोबायोटिक्स पचन सुधारून कॅल्शियम शोषण्यास मदत करतात. रोज एक ग्लास दूध पिणे फायदेशीर ठरते.
३. पांढरे तीळ :
तिळामध्ये दुधापेक्षा अधिक कॅल्शियम आढळते. रोज सकाळी एक चमचा भाजलेले तीळ खाल्ल्यास हाडे मजबूत होण्यास मदत होते. तसेच तिळामध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड्सही असतात.
४. पालेभाज्या :
पालक, मेथी, शेपू यांसारख्या पालेभाज्यांमध्ये कॅल्शियमसोबत व्हिटॅमिन के मुबलक प्रमाणात असते. हे व्हिटॅमिन हाडांमध्ये कॅल्शियम टिकवून ठेवण्यास मदत करते.
५. बदाम :
बदामामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम मोठ्या प्रमाणात असते. रोज ५ ते ६ बदाम भिजवून खाल्ल्यास हाडांच्या मजबुतीसाठी फायदा होतो.
चाळिशीनंतर हाडांची योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि कॅल्शियमयुक्त पदार्थांचा समावेश केल्यास हाडे मजबूत राहू शकतात आणि भविष्यातील आजारांपासून बचाव होऊ शकतो.




