कृषितज्ञ अतुल डेरे यांची “सातारा प्राईड 2026” पुरस्कारासाठी निवड जाहीर
सातारा : सातारा जिल्ह्यातील शेती क्षेत्रात नावारूपास आलेल्या कवठे गावात उत्पादनवाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने विविध नवनवीन प्रयोग राबवले जात आहेत. या कृषी परिवर्तनामागे प्रगतशील शेतकरी अतुल डेरे यांचे मोलाचे योगदान असून, त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांची “सातारा प्राईड 2026” पुरस्कारासाठी निवड जाहीर करण्यात आली आहे.
गटशेती, ठिबक सिंचन, ऑटोमेशन यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरामुळे शेतीतील उत्पादनात लक्षणीय वाढ होत आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी त्यांनी राबवलेले प्रयोग आज मार्गदर्शक ठरत आहेत.
कवठे कृषी क्रांती शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून हळद, केळी, पपई, आले, टरबूज, स्ट्रॉबेरी, जरबेरा यांसारख्या विविध पिकांचे उत्पादन घेतले जाते. या कंपनीच्या यशस्वी मॉडेलचा अभ्यास करण्यासाठी इस्राईल, इंग्लंड, अमेरिका तसेच युरोपमधील शेतकरी व कृषी तज्ञ कवठे येथे भेट देत असतात.
शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल अतुल डेरे यांना राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक गौरव प्राप्त झाले आहेत. त्यांच्या या कृषी क्रांतीची दखल घेत सातारा न्यूज मीडिया सेवनच्या वतीने दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठेच्या “सातारा प्राईड 2026” पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे.
त्यांच्या निवडीबद्दल कृषी क्षेत्रातून समाधान व्यक्त होत असून, सातारा जिल्ह्याच्या कृषी प्रगतीत त्यांचे योगदान प्रेरणादायी मानले जात आहे.




