यशोदा इन्स्टिट्यूटस मध्ये समता, बंधुता आणि एकतेचे मूल्य रुजवण्याचे कार्य: नितीन चंदनशिवे
यशोत्सव २०२६ चा भव्य शुभारंभ, युवा महोत्सव तसेच बक्षीस वितरण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न
यशोदा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स, सातारा यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या “यशोत्सव २०२६” या वार्षिक सांस्कृतिक व युवा महोत्सवाचा भव्य शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. या उद्घाटन सोहळ्यास प्रसिद्ध कवी, लेखक व प्रभावी व्याख्याते श्री. नितीन सुभाष चंदनशिवे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. दशरथ सगरे हे होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. आपल्या प्रेरणादायी भाषणात नितीन चंदनशिवे यांनी विद्यार्थ्यांना जातिभेद, विषमता व संकुचित मानसिकतेपासून दूर राहण्याचा संदेश देत, आपण सर्वप्रथम भारतीय आहोत, ही भावना जोपासा, असे ठामपणे सांगितले. समाजात समता, बंधुता आणि एकतेचे मूल्य रुजवण्याचे आवाहन त्यांनी केले. या कार्यासाठी यशोदा इन्स्टिट्यूट चे त्यांनी कौतुक केले.
यासोबतच त्यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रामाणिक कष्ट, सातत्य, आत्मविश्वास, सकारात्मक दृष्टिकोन आणि मूल्यनिष्ठा या गुणांची गरज अधोरेखित केली. अपयशाला घाबरू नका, तर त्यातून शिकून पुढे जा, असा प्रेरणादायी संदेश देत त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास जागवला. त्यांच्या काव्यपंक्ती आणि ओघवत्या शैलीतील संवादाने उपस्थितांची मने जिंकली.
यशोत्सव २०२६ अंतर्गत पारंपरिक दिन, सांस्कृतिक कार्यक्रम, नृत्य, गायन, नाट्यप्रयोग, फन फेअर, ट्रेड फेअर, क्रीडा स्पर्धा तसेच विविध सर्जनशील उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देणे, नेतृत्वगुण विकसित करणे आणि सांस्कृतिक वारसा जपणे हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे.
या कार्यक्रमांमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव चे पारितोषिक वितरण करण्यात आले, विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस सोबत कावली
कार्यक्रमास उपाध्यक्ष डॉ. अजिंक्य सगरे, बब्रुवान सगरे, संजय शेलार, अतुल माळी, संजय कदम, सतीश जाधव, राजेंद्र साळुंखे, पिंटू नाईकवडी, राजेश वंजारी, डॉ. विक्रम पाटील, आर्कि. सुहास तळेकर, डॉ. समीक्षा निकम, डॉ. प्रकाश जाधव, डॉ.विठ्ठल चवरे, डॉ. प्रवीण गावडे, विविध विभागांचे प्राचार्य, प्राध्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
प्रास्ताविकात सहसंचालक प्रा. डॉ. रणधिरसिंह मोहिते आयोजकांनी यशोत्सवामागील संकल्पना विशद केली. अहवाल वाचन कुलसचिव डॉ. गणेश सुरवसे यांनी केले, पाहुण्यांचा परिचय डॉ. समीक्षा निकम यांनी केला. सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन सांस्कृतिक समितीच्या वतीने सुप्रिया भांडवलकर यांनी आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी यशोत्सव समिती, विद्यार्थी स्वयंसेवक व सर्व विभागांनी विशेष परिश्रम घेतले.
यशोत्सव २०२६ हा केवळ सांस्कृतिक उत्सव नसून, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी एक प्रेरणादायी व्यासपीठ ठरत असल्याचे मत यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.




