यशोदा टेक्निकल कॅम्पस येथे संत गाडगे बाबांची जयंती उत्साहात साजरी
सातारा : यशोदा टेक्निकल कॅम्पस, अभियांत्रिकी विद्याशाखा, सातारा येथे सोमवार, दिनांक २३ फेब्रुवारी २०२६ रोजी थोर समाजसुधारक, संत गाडगे बाबा यांची जयंती मोठ्या उत्साहात, श्रद्धा आणि सामाजिक जाणीवेच्या भावनेतून साजरी करण्यात आली.
हा कार्यक्रम सकाळी ११:०० वाजता अभियांत्रिकी इमारतीच्या प्रशासकीय कार्यालयासमोर आयोजित करण्यात आला होता. यावेळी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसेच प्रशासकीय अधिकारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून संत गाडगे बाबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी संत गाडगे बाबांच्या कार्याचा आणि विचारांचा परिचय करून देण्यात आला. समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, व्यसनाधीनता आणि अस्वच्छता दूर करून स्वच्छ, सुसंस्कृत आणि समताधिष्ठित समाजनिर्मितीचा संदेश त्यांनी आपल्या आयुष्यातून दिला, यावर वक्त्यांनी सविस्तर प्रकाश टाकला.
याप्रसंगी विद्यार्थ्यांना उद्देशून बोलताना वक्त्यांनी सांगितले की, स्वच्छता, निस्वार्थ सेवा, सामाजिक समता, व्यसनमुक्त जीवन आणि समाजातील दुर्गुणांचे निर्मूलन ही संत गाडगे बाबांची मूल्ये आजच्या पिढीसाठी अत्यंत मार्गदर्शक आहेत. या मूल्यांचे आचरण केल्यास विद्यार्थी केवळ उत्तम अभियंते नव्हे, तर जबाबदार, संवेदनशील आणि राष्ट्रहित जपणारे नागरिक घडू शकतात.
कार्यक्रम संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. दशरथ सगरे आणि उपाध्यक्ष डॉ. अजिंक्य सगरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. यावेळी कुलसचिव डॉ. गणेश सुरवसे आणि प्राचार्य डॉ. विक्रम एस. पाटील प्रमुख उपस्थित होते. त्यांनी आपल्या मनोगतातून संत गाडगे बाबांच्या समाजप्रबोधन कार्याचा गौरव करताना विद्यार्थ्यांनी त्यांच्या विचारांचे आचरण करून समाजोपयोगी उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले.कार्यक्रमाचे सांस्कृतिक समन्वय प्रा. डॉ. अमृता मोहिते यांनी प्रभावीपणे साधला, तर कार्यक्रमाचे सुयोग्य संयोजन प्रा. श्री. एन. एम. मुल्ला यांनी केले.
या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भान, स्वच्छतेबद्दलची जाणीव आणि सेवाभाव वृद्धिंगत झाला. संत गाडगे बाबांच्या विचारांचे स्मरण करून शैक्षणिक परिसर स्वच्छ, सुसंस्कृत आणि प्रेरणादायी ठेवण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.




