राष्ट्रीय सेवा योजना शिबीरे ही श्रम व संस्कारांची व्यासपीठे: चेअरमन श्री. राजेंद्र कदम
सातारा -राष्ट्रीय सेवा योजना शिबीरे ही श्रम व संस्कारांची व्यासपीठे असून या शिबिरातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी संस्कार, जिद्द, चिकाटी आणि परिश्रम घेतले तर आपल्या आयुष्याचा भविष्यातील राजमार्ग सुकर होतो, असे प्रतिपादन श्री मुधाईदेवी शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री. राजेंद्र कदम यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ. कमलसिंग क्षत्रिय यांनी केले तर पाहुण्यांची ओळख डॉ.संध्या पौडमल यांनी करून दिली. समारोप कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने आणि संत गाडगे महाराज व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमापुजनाने मान्यवरांच्या शुभहस्ते झाली.
श्री मुधाईदेवी शिक्षण संस्थेच्या प्रा.संभाजीराव कदम महाविद्यालय, देऊर राष्ट्रीय सेवा योजनेच्या तळीये गावात आयोजित करण्यात आलेल्या विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या समारोप समारंभात ते बोलत होते.
श्री.कदम पुढे म्हणाले कि, देऊर आणि तळीये गावचा विशेष ऋणानुबंध आहे. तळीये गावाने आमच्या महाविद्यालयाचे श्रमसंस्कार शिबीर यशस्वीपणे घेऊन हा ऋणानुबंध आणखीनच घट्ट केलेला आहे. श्री मुधाईदेवी शिक्षण संस्था शिस्त आणि गुणवत्ता यासाठी सुपरिचित असून संस्थेने देऊर आणि पंचक्रोशीत सन १९५६ पासून शैक्षणिक परिवर्तनाचे प्रतिक म्हणून या परिसरात आदर्शवत कार्य केलेले आहे. भविष्याचा वेध घेत ग्रामीण भागातील तरुणांना जगाच्या बाजारात समर्थपणे उभे राहता येण्यासाठी व स्वयंरोजगाराची वैविध्यपूर्ण कौशल्ये आत्मसात करण्यासाठी संस्था विविध शैक्षणिक उपक्रम हाती घेत आहे. त्याचबरोबर या संस्थेत कार्यरत असताना सामाजिक बांधिलकी, समाजसेवा आणि शैक्षणिक विकासाचे माध्यम म्हणून आम्ही सर्वजण कार्यरत आहोत. त्यामुळे संस्थेत ग्रामीण भागात शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी जिद्द आणि चिकाटीने शिक्षण घेत या शैक्षणिक माध्यमातून आपला विकास करून घेतला पाहिजे.
यावेळी बोलताना राजमाता नर्सिंग कॉलेजचे संस्थापक श्री.नरसिंगराव दिसले म्हणाले कि, आपली कुटुंबे, शैक्षणिक संस्था, गुरुजन आणि समाज यांच्या माध्यमातून आपल्यावर संस्कार होतात. ग्रामीण भागातील खेडी संस्कारांची केंद्रे असून आपल्या आईवडिलांची स्वप्ने साकार करण्यासाठी आपण प्रयत्नशील असले पाहिजे. आजच्या युगातील विद्यार्थी मोबाईलच्या विळख्यात अडकलेला असून त्याने आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. विशेष करून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या विद्यार्थ्यांनी याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे, असे परखड वास्तव त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून केले.
यावेळी माजी सरपंच आणि चेअरमन पोपटराव(आबा) चव्हाण आणि सामाजिक कार्यकर्ते श्री.भाऊसाहेब वाघ यांनीही मार्गदर्शन केले. सदर समारोप कार्यक्रमात श्री आर.जी.चव्हाण सर, सौ.सारिकाताई चव्हाण यांनी ग्रामस्थाच्या वतीने मनोगते व्यक्त केली. तसेच नाजीम पठाण, कु.जान्हवी माने, कु.श्रेया भोसले, कु.आलिशा दफेदार, कु.आकांक्षा माने या स्वयंसेवकांनी आपले शिबिरातील अनुभव सांगितले.
यावेळी तळीये गावातर्फे शिबिरातील स्वयंसेवकांचा विशेष श्रमसंस्कार शिबिराची आठवण म्हणून श्री. सत्यवान चव्हाण यांच्या हस्ते ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला तसेच शिबिराचे यशस्वी संयोजन केल्याबद्दल श्री.रणजीत घनवट यांच्या हस्ते महाविद्यालयास विशेष ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. सदरची ट्रॉफी महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉ. माधुरी शिंदे यांनी स्वीकारली.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहा.प्रा.सुर्यकांत अदाटे आणि सहा.प्रा.मनिषा पवार यांनी केले. आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ.उत्तम आळतेकर यांनी केले. सदर कार्यक्रमास तळीये गावचे सरपंच श्री.सुशीलकुमार शिलवंत, उपसरपंच श्री.विक्रम चव्हाण, श्री.युवराज चव्हाण, श्री.अमर चव्हाण, श्री.शरद चव्हाण, श्री.मोहनराव देशमुख, श्री.बाजीराव चव्हाण, श्री.कालिदास चव्हाण, श्री राजेंद्र जाधव, श्रीधर भोसले, श्री.निलेश माने, श्री वसंतराव गायकवाड, श्री जनार्दन चव्हाण, सौ.प्रियांका शिलवंत, मुख्याध्यापिका सौ.प्रमिला नलवडे, महाविद्यालयातील प्राध्यापक, प्रशासकीय सेवक, राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक तसेच तळीये ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



