३५ वर्षांचा विश्वास, प्रगतीचा वटवृक्ष : शिवशक्ती सहकारी पतसंस्था शिवथर
सातारा प्रतिनिधी – शिवशक्ती पतसंस्थेचा ३५ वा वर्धापन दिन सोहळा उत्साहात संपन्न.सहकार क्षेत्रातील विश्वासार्ह नाव असलेल्या शिवशक्ती सहकारी पतसंस्था मर्या. शिवथर यांचा ३५ वा वर्धापन दिन आणि ३६ व्या वर्षातील पदार्पण सोहळा आज संस्थेच्या मुख्य कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ३५ वर्षांच्या या यशस्वी प्रवासाचा आनंद ‘कॅन्डल’ लावून आणि केक कापून साजरा करण्यात आला.
६० हजारांपासून ११८ कोटींपर्यंतची उत्तुंग झेप!
कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेचे सीईओ श्री सचिन साबळे यांनी संस्थेचा आर्थिक लेखाजोखा मांडला. १९९१ साली केवळ ६० हजार रुपयांच्या भांडवलावर सुरू झालेल्या या रोपट्याचे आज ११८ कोटी ठेवी, ९३ कोटी कर्जवाटप आणि ७ कोटी भागभांडवलाच्या वटवृक्षात रूपांतर झाले आहे, ही माहिती देताना सर्वांचा ऊर अभिमानाने भरून आला.
हणमंत साबळे (संस्थापक व माजी चेअरमन): त्यांनी संस्था नोंदणीच्या काळातील संघर्ष आणि आजच्या ‘डिजिटलायझेशन’च्या युगात संस्थेने घेतलेली झेप यावर प्रकाश टाकला.
मधुकर नलावडे नाना (व्हॉइस चेअरमन): “संस्थेचे वटवृक्षात रूपांतर होण्यामागे सेवकांचा सिंहाचा वाटा आहे,” अशा शब्दांत त्यांनी कर्मचाऱ्यांच्या कष्टाचा गौरव केला.
प्रभाकर साबळे (संस्थापक व विद्यमान चेअरमन): संस्थेच्या जडणघडणीत सेवकांसाठी घेतलेल्या कार्यशाळा आणि त्यातून मिळालेला ‘रिझल्ट’ पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. संस्था भविष्यात अधिक उंची गाठेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
’शिवशक्ती’च्या पायरीचा आशीर्वाद: श्रीराम जाधव यांचा गौरव!
या सोहळ्याचे खास आकर्षण ठरले ते म्हणजे संस्थेचे सभासद आणि माजी सेवक श्री. श्रीराम जाधव यांचा सत्कार. उस्मानाबादी शेळ्यांचे संगोपन व प्रजननासाठी त्यांना केंद्र सरकारच्या ICAR कडून उत्कृष्ट संशोधन पुरस्कार’ मिळाला आहे.
सत्काराला उत्तर देताना जाधव साहेब भावूक झाले. ते म्हणाले, “संस्थेची पायरी माझ्यासाठी देवळासारखी आहे. आजही मी पायरीचे दर्शन घेऊनच पुढचे पाऊल टाकतो. माझ्या व्यवसायाच्या जडणघडणीत दादा आणि नानांचे मोठे पाठबळ आहे.” त्यांना शाल, श्रीफळ आणि हणमंत साबळे लिखित ‘विचार संग्रह’ पुस्तक देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचा समारोप संस्थेचे संचालक शशिकांत सावंत यांनी उपस्थितांचे आभार मानून केला. या प्रसंगी सर्व संचालक, सभासद सेवक उत्साहाने उपस्थित होते.




