साताऱ्याच्या अस्मितेला सुरेल सलाम‘आम्ही सातारी’ गीताचा मंगळवारी शाहू कलामंदिरात भव्य प्रकाशन सोहळा
सातारा प्रतिनिधी –साताऱ्याची ओळख, संस्कृती, एकतेचा अभिमान आणि लोकभावना यांचे सुरेल प्रतिबिंब असलेले भव्य संगीतमय अभिवादन ”आम्ही सातारी” हे गीत लवकरच रसिकांच्या भेटीस येत आहे. जिल्ह्यात सुमारे १३५० किलोमीटर भटकंती करत साकारलेल्या या गाण्यात असलेला स्थानिकांचा सहभाग आणि राष्ट्रीय पातळीवरील संगीतात्मक दर्जा यांचा दुर्मिळ संगम या गीतातून अनुभवायला मिळणार असून मंगळवारी (दि. २७) सातारच्या शाहू कलामंदिरात या गीताचा भव्य प्रकाशन सोहळा होणार आहे. हे गीत साताऱ्याच्या अस्मितेला एकप्रकारे सुरेल सलाम ठरणार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

या गीताचे मास्टरिंग दोन वेळा ग्रॅमी पुरस्कार विजेते पी. ए. दीपक यांनी ए. आर. रहमान स्टुडिओ येथे केल्याने प्रकल्पाला जागतिक दर्जाची तांत्रिक झळाळी लाभली आहे. द्रौपदी क्रिएशन्स निर्मित आणि सक्सेस अबॅकस यांच्या सहकार्याने साकारलेल्या या गीताची निर्मिती सोनल चंद्रकांत तानवडे आणि तृप्ती साळुंखे – बने यांनी केली असून, अमृता अमोल थोरवे सह-निर्मात्या म्हणून कार्यरत आहेत. गीताचे संगीत सुप्रसिद्ध संगीतकार आणि दिग्दर्शक प्रणय शेट्ये यांनी दिले आहे. त्यांच्या ”कोकण कोकण” या गीताने लवकरच ५० लाख व्ह्यूजचा टप्पा गाठत लोकप्रियतेचा नवा मानदंड प्रस्थापित केला आहे.
जांबगाव (सातारा) येथील सुपुत्र प्रणीत सुनील निकम यांनी हे गीत लिहिले व गायले असून, त्यामुळे या संगीतमय उपक्रमाला ठळक स्थानिक ओळख मिळाली आहे. गीतामध्ये प्रसिद्ध रॅपर्स शंभू आणि विपिन तातड यांचा सहभाग असून, मुक्ती कोयंडे यांच्या सुमधुर आवाजाने गीत अधिक भावपूर्ण झाले आहे. तसेच सुप्रसिद्ध व्यक्तिमत्त्व सारंग साठ्ये विशेष पाहुण्या भूमिकेत झळकणार आहेत.
या गीताचे सर्वात वैशिष्ट्यपूर्ण अंग म्हणजे सुमारे २०० स्थानिक नागरिकांचा सक्रिय सहभाग. त्यामुळे ”आम्ही सातारी” हे गीत केवळ एक संगीतप्रकल्प न राहता, साताऱ्याच्या सामूहिक अभिमानाचे प्रतीक ठरणाऱ्या लोकचळवळीचे रूप धारण करते.
या गीताचा अधिकृत प्रकाशन सोहळा मंगळवारी (दि. २७ जानेवारी) शाहू कलामंदिर, सातारा येथे पार पडणार असून यावेळी खा. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, श्रीमंत छत्रपती दमयंतीराजे भोसले (राणीसाहेब), आणि श्रीमंत छत्रपती वृषालीराजे भोसले यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
या गीत उपक्रमासाठी राऊ वाडा ॲण्ड मिसळ, मॅग्नस कार्व्हन्स रिसॉर्ट, कांग्राळकर असोसिएट्स, पालेकर बेकरी, कदम टूर्स अँड ट्रॅव्हल्स, एबी कार ॲण्ड बाईक स्पा, पंकज चव्हाण डान्स अकॅडमी, श्री गौरीशंकर डायग्नोस्टीक, तुळजाराम मोदी पेढेवाले, हॉटेल लक्ष्मी, कमांडो अकॅडमी, साई टूर्स अँड ट्रॅव्हल्स, कॉफीया आदींचे सहकार्य लाभले आहे.
सशक्त संगीत, अर्थपूर्ण शब्दरचना आणि व्यापक लोकसहभाग यांच्या बळावर ”आम्ही सातारी” हे गीत साताऱ्याच्या ओळखीचा, एकतेचा आणि अभिमानाचा हृदयस्पर्शी संगीतमय आविष्कार ठरणार आहे.
– सोनल चंद्रकांत तानवडे – निर्माती, मुंबई



