महाराष्ट्र @ दावोस: एआय, इनोव्हेशन सिटी ते रायगड–पेण ग्रोथ कॉरिडॉर आर्थिक प्रगतीची घोडदौड
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावोस येथे पार पडलेल्या ‘वर्ल्ड इकोनॉमिक फोरम 2026’मध्ये सहभाग नोंदविला. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, वर्ल्ड इकोनॉमिक फोरमसाठी भारताच्या वतीने 10 राज्यांचे प्रतिनिधित्व करण्यात आले असून, त्यामध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणे ही अत्यंत अभिमानास्पद आणि आनंदाची बाब आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘वर्ल्ड इकोनॉमिक फोरम 2026’च्या माध्यमातून महाराष्ट्रात कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक येत असल्याची घोषणा केली. यामध्ये उद्योग, सेवा, शेती, तंत्रज्ञान, एआय डेटा सेंटरसह इन्होवेशन सिटी, रायगड-पेण ग्रोथ कॉरिडॉर अशा अनेक महत्पूर्ण आणि महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीचा आलेख उंचावणाऱ्या घोषणांचा समावेश आहे. एकूण गुंतवणूक करारांपैकी 83% करारांमध्ये एफडीआयचा समावेश आहे. तसेच 18 देशांमधून महाराष्ट्रात गुंतवणूक येत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
केवळ मुंबई मेट्रोपॉलिटन परिसरच नव्हे तर, कोकण, मराठवाडा आणि विदर्भासह राज्याच्या विविध भागात गुंतवणूक येणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. तसेच उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक, अहिल्यानगर, नंदूरबार आणि धुळे या भागात देखील मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होणार आहे.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, येऊ घातलेल्या ‘तिसऱ्या मुंबई’मध्ये टाटा सन्सच्या माध्यमातून इनोव्हेशन सिटी उभारण्यात येणार आहे. भविष्यसज्ज शहरांसाठी ही इनोव्हेशन सिटी महत्त्वाची असणार आहे. यासह रायगड-पेण येथे ग्रोथ सेंटर उभारले जाणार आहे. बीकेसीप्रमाणे रायगड-पेण येथे एमएमआरडीए आणि खासगी सेक्टरच्या सहकार्याने व्यावसायिक केंद्र उभारले जाणार आहे. अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी यात गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे.
महाराष्ट्रासाठी यावर्षीचा दावोस दौरा हा परकीय गुंतवणुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरला असून या माध्यमातून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येणार असून मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.




