बावधन गटात सत्तासमीकरण उलथवणारी खेळी; विराज शिंदेंचा राष्ट्रवादीत प्रवेश म्हणजे भाजपसाठी धोक्याची घंटा
(सादिक सय्यद राजकीय अभ्यासक पत्रकार): बावधन गटाच्या राजकारणात खळबळ उडवणारी घडामोड घडली असून, आजवर मंत्री मकरंद पाटील यांचे कट्टर विरोधक मानले जाणारे युवा नेते विराज शिंदे आणि ऋतुजा शिंदे यांनी त्यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. हा प्रवेश म्हणजे वाई तालुक्याच्या राजकीय सारीपाठावर टाकलेली निर्णायक चाल ठरत असून, जिल्हा परिषद निवडणुकीची दिशा बदलणारा ठरू शकतो.
विराज शिंदे हे केवळ विरोधासाठी विरोध करणारे नेते नसून, जमिनीवरील राजकारणाची अचूक जाण असलेले, संघटनात्मक ताकद असलेले आणि मतदारांवर प्रभाव टाकणारे नेतृत्व म्हणून ओळखले जातात. आजवर मंत्री मकरंद पाटील यांना त्यांनी टोकाचा विरोध केला असला, तरी बदलत्या राजकीय वास्तवाची अचूक नोंद घेत त्यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत सर्वच राजकीय समीक्षकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.
भाजपकडून मंत्री मकरंद पाटील यांना बावधन गटात कोंडीत पकडण्याचे प्रयत्न सुरू असतानाच, विराज शिंदेंसारख्या ताकदवान नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश म्हणजे भाजपच्या गणितावर पाणी फेरणारी चाल ठरली आहे. वाई तालुक्यात नव्या राजकीय आघाडीची नांदी ठरलेली ही घडामोड ‘राजकीय भूकंप’ म्हणावी अशीच आहे.
मंत्री मकरंद पाटील यांना आता विराज शिंदेंसारखा मुरब्बी, लढवय्या आणि जनाधार असलेला शिलेदार मिळाल्याने बावधन गटातील जिल्हा परिषद निवडणूक केवळ चुरशीची नव्हे, तर सत्तेचा तोल कुणाच्या बाजूने झुकणार, हे ठरवणारी ठरणार, हे मात्र नक्की.




