महाबळेश्वर: जिल्हा परिषद निवडणुकीसाठी रणधुमाळी सुरू; तळदेव गटातून ‘संकपाळ’ दांपत्यासह राष्ट्रवादीचे आव्हान
महाबळेश्वर | दि. २० जानेवारी २०२६ जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रक्रियेला आता वेग आला असून, आज महाबळेश्वर तालुक्यातील विविध गट आणि गणांसाठी उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज (नामनिर्देशन पत्रे) मोठ्या उत्साहात दाखल केले. यामध्ये प्रामुख्याने तळदेव गटात चुरस पाहायला मिळत असून, भिलार गटात मात्र आज एकही अर्ज दाखल झाला नसल्याची माहिती जिल्हा निवडणूक विभागाने दिली आहे.
तळदेव गटात तिरंगी लढत?
जि. प. तळदेव गटातून आज तीन उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. यामध्ये शिवसेनेच्या वतीने अजित रामचंद्र संकपाळ यांनी अर्ज दाखल केला असून, त्यांच्या पत्नी रेणुका अजित संकपाळ यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. तसेच, नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टीच्या वतीने संजय रामचंद्र गायकवाड यांनीही आपले नामनिर्देशन पत्र दाखल करून तगडे आव्हान उभे केले आहे.
दुसरीकडे, भिलार जिल्हा परिषद गटात आज एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केला नाही, त्यामुळे या गटातील हालचालींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पंचायत समिती गणनिहाय स्थिती
तालुक्यातील चार प्रमुख गणांमध्ये आज विविध पक्षांच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले:
▪️६७ कुंभरोशी गण: येथे राष्ट्रवादीचे सचिन श्रीरंग उतेकर आणि शिवसेनेचे संजय हरिश्चंद्र मोरे यांच्यात थेट लढत होण्याची चिन्हे आहेत.
▪️68 तळदेव गण:या गणात शिवसेनेचे संजय विठ्ठल शेलार,अपक्ष गोविंद देवजी संकपाळ आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अभिषेक आत्माराम शिंदे* यांनी अर्ज दाखल केले आहेत. येथे शिवसेना विरुद्ध शिवसेना (उबाठा) असा सामना रंगण्याची शक्यता आहे.
९ मेटगुताड गण:या गणातून आज केवळ नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टीच्या शकुंतला रमेश चोरमले यांचा एकमेव अर्ज दाखल झाला आहे.
▪️७० भिलार गण:या गणात महिला उमेदवारांची संख्या अधिक असून, राष्ट्रवादीकडून सविता रामचंद्र गोळे व वंदना प्रवीण भिलारे यांनी अर्ज भरले आहेत, तर पूनम निलेश गोळे यांनी अपक्ष म्हणून शड्डू ठोकला आहे.
उमेदवारी अर्ज भरण्याच्या आजच्या प्रक्रियेनंतर आता राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, पुढील काळात कोण माघार घेणार आणि कोणाचे अर्ज वैध ठरणार, याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे.




