“नवी उमेद, नवी आशा, नव्या तेजोमयाने; ‘मी पुन्हा येईन’ – डॉ. तेजस्विनी भिलारे”
“सत्ता नव्हे, संस्कार महत्त्वाचे; भिलारे कुटुंबियांचा मोठेपणा पुन्हा सिद्ध”
भिलार प्रतिनिधी -प्रवीण भिलारे यांनी कै. बाळासाहेब भिलारे यांची केलेली निष्ठावंत सेवा हे आमच्यावर ऋण आहे. आज त्या ऋणाची परतफेड करण्याची वेळ आली आहे,” अशा भावनिक शब्दांत डॉ. तेजस्विनी भिलारे यांनी आपली भूमिका स्पष्ट करत प्रवीण भिलारे यांच्या सौभाग्यवती वंदना भिलारे यांना पंचायत समितीच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा केली.
महाबळेश्वर तालुक्यातील भिलार गणाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले असताना आज येथे एक ऐतिहासिक आणि भावनिक निर्णय झाला. पंचायत समितीच्या जागेसाठी डॉ. तेजस्विनी भिलारे आणि बाळासाहेब भिलारे यांचे विश्वासू कार्यकर्ते प्रवीण भिलारे हे दोघेही आग्रही होते. त्यामुळे या गणात काही काळ संभ्रमाची स्थिती निर्माण झाली होती. अखेर हा प्रश्न मंत्री मकरंदआबा पाटील यांच्या उपस्थितीत चर्चेसाठी गेला.
मंत्री मकरंदआबा पाटील यांच्यासोबत झालेल्या सुमारे दोन तासांच्या बैठकीत त्यांनी स्पष्ट भूमिका मांडत सांगितले की, “हा प्रश्न कौटुंबिक स्वरूपाचा आहे. दादांचं कुटुंब म्हणजे माझंही कुटुंब आहे. त्यामुळे या विषयात थेट हस्तक्षेप करणे मला योग्य वाटत नाही. दादांशी माझं नातं राम–लक्ष्मणासारखं होतं,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
या चर्चेदरम्यान डॉ. तेजस्विनी भिलारे यांनी उमेदवारीबाबत आपली भूमिका मांडली, तर प्रवीण भिलारे यांनीही “मी गेली वीस वर्षे कै. बाळासाहेब भिलारे यांच्या पाठीशी सावलीप्रमाणे उभा राहून त्यांची मनोभावे सेवा केली आहे. त्यामुळे यावेळी मला संधी मिळावी,” अशी भावना व्यक्त केली. यावेळी तालुक्यातील नेते राजेंद्र शेठ राजपुरे यांनीही चर्चेत सहभाग घेत तेजस्विनी भिलारे यांचे म्हणणे ऐकून घ्यावे, असा आग्रह धरला.
या सर्व पार्श्वभूमीवर प्रवीण भिलारे यांच्या निष्ठेचा आणि सेवाभावाचा सन्मान करत डॉ. तेजस्विनी भिलारे यांनी अत्यंत संवेदनशील निर्णय घेतला. “तुम्ही बाळासाहेबांसाठी जे काही केले, ते आमच्या कुटुंबावरचं कर्ज आहे. आज त्या कर्जातून मुक्त होण्याची वेळ आली आहे,” असे सांगत त्यांनी प्रवीण भिलारे यांच्या कुटुंबाला, म्हणजेच त्यांच्या सौभाग्यवती वंदना भिलारे यांना उमेदवारी देण्याची घोषणा केली.
या निर्णयामुळे कार्यकर्त्यांमधील संभ्रम दूर झाला असून भिलार गणात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. हा क्षण महाबळेश्वर तालुक्याच्या राजकारणातील एक भावनिक आणि महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. ‘ऋणानुबंध’ आणि ‘त्यागाची पोचपावती’ या दोन्हींचे दर्शन या निर्णयातून घडले.
कै. बाळासाहेब भिलारे हे महाबळेश्वर तालुक्याच्या राजकारणातील किंगमेकर आणि गॉडफादर म्हणून ओळखले जात होते. त्याच राजकीय वारशाची जपणूक करत भिलारे कुटुंबीयांनी कार्यकर्त्यांसाठी मोठे मन दाखवले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस गटासाठी आणि संबंधित गणात विजयाचा मार्ग सुकर झाल्याचे बोलले जात आहे.
मी पुन्हा येईल नवी उमेद नवी आशा व नव्या तेजोमयाने मी पुन्हा येईल
डॉ.तेजस्विनी भिलारे
या संपूर्ण प्रक्रियेत भिलारे कुटुंबीय, ग्रामस्थ, तसेच तालुक्याचे नेते राजेंद्र शेठ राजपुरे आणि मंत्री मकरंदआबा पाटील यांनी योग्य चर्चा व समन्वय साधत परिस्थिती शांततेत हाताळली. विशेष म्हणजे, वंदना भिलारे यांना उमेदवारी जाहीर करताना कोणतीही अट न ठेवता हा निर्णय जाहीर करण्यात आला, याची तालुक्यात मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहे.




