राज्यात भाजप नंबर एकचा पक्ष २९ पैकी २४ महापालिकांत सत्ता, चुरशीच्या लढतीनंतर मुंबईत यश
मुंबई :विधानसभा आणि नगरपालिकां पाठोपाठ महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये सर्वाधिक जागा जिंकून ‘शत प्रतिशत’च्या दिशेने भाजपची वाटचाल सुरू झाली आहे. मुंबई महानगरपालिकेची प्रतिष्ठेची निवडणूक जिंकून भाजपने देशाच्या आर्थिक राजधानीवर आपले अधिराज्य प्रस्थापित केले आहे.
२९ पैकी २४ महानगरपालिकांमध्ये महायुतीचा सत्ता येण्याएवढे संख्याबळ मिळाले आहे. या निवडणुकीत भाजपचा आलेख चढता असला तरी मित्र पक्ष शिवसेना शिंदे व राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची मात्र पीछेहाट झाली. विरोधकांचा विचार करता, काँग्रेसने पालिकांपाठोपाठ महापालिकांमध्ये सर्वाधिक जागा जिंकल्या. मुस्लीमबहुल प्रभागांमध्ये एमआयएमला मिळालेल्या यशाने प्रस्थापित पक्षांसाठी धोक्याचा इशारा मानला जातो.
गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्वबळाचे सूतोवाच केले होते. आता राज्यातील भाजपची विधानसभेनंतर पालिका आणि महापालिकांतील कामगिरी पाहता या दिशेने वाटचाल करीत असल्याचे निकालांवरून स्पष्ट होते. राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये सर्वाधिक जागा जिंकून भाजपने सर्व राजकीय पक्षांना मोठा धक्का दिला.
मुंबई महानगरपालिकेची निवडणूक भाजपने प्रतिष्ठेची केली होती. कोणत्याही परिस्थितीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मुंबई महानगरपालिकेतून हद्दपार करण्याचे उद्दिष्ट भाजपने साध्य केले आहे. भाजप व शिंदे गटाला एकतर्फी यश मिळेल, असा अंदाज वर्तविला जात होता. पण उद्धव ठाकरे व राज ठाकरे बंधूंनी बहुमतासाठी शेवटपर्यंत भाजपला झुंजवले. २०१७च्या निवडणुकीत भाजपचे ८२ नगरसेवक निवडून आले होते. त्यापेक्षा थोडे अधिक यश त्यांना मिळाले. शिवसेनेची शकले झाली तरी उद्धव ठाकरे गटाने चांगली लढत दिली. मराठी विरुद्ध अमराठी वादात मराठीबहुल प्रभागांमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे अधिक उमेदवार निवडून आले आहेत.
मुंबईसह नाशिक, सोलापूर, कोल्हापूर, नवी मुंबई, पनवेल, मीरा-भाईंदर, पुणे, पिंपरी- चिंचवड, नागपूर, अकोला, अमरावती, सांगली, जळगाव, धुळे, अहिल्यानगर आदी महानगरपालिकांमध्ये भाजपचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले असून, तेथे महापौरपद मिळण्यास काही अडचण येणार नाही. शिवसेना शिंदे गटाला ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर या महानगरपालिकांमध्ये यश मिळाले.
राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठा फटका बसला. पुणे व पिंपरी – चिंचवड महानगरपालिकांची निवडणूक प्रतिष्ठेची करूनही अजित पवारांना मोठा धक्का बसला. या निकालाने अजित पवारांचे महत्त्व कमी झाले आहे. यापुढील काळात भाजपच्या आदेशानुसार अजित पवारांना काम करावे लागेल, अशी शक्यता आहे. काँग्रेसला लातूर, चंद्रपूरमध्ये यशशिवसेना ठाकरे गटाने सारी ताकद ही मुंबईत लावली होती. मुंबईत पक्षाला सत्ता गमवावी लागली. परभणीमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे सर्वाधिक सदस्य निवडून आले आहेत. काँग्रेसला लातूरमध्ये बहुमत मिळाले. भिवंडी व चंद्रपूरमध्ये काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. मालेगावरमध्ये इस्लाम पार्टीला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. वसई – विरारमध्ये बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर यांनी पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले.
अन्य पक्षांना यश मिळालेल्या महानगरपालिका मालेगाव, चंद्रपूर, लातूर, वसई-विरार, भिवंडी-निजामपूर, परभणी
भाजप किंवा महायुतीला सत्ता मिळणाऱ्या महानगरपालिका :मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, पुणे, पिंपरी- चिंचवड, नागपूर, अकोला, अमरावती, सोलापूर, अकोला, पनवेल, धुळे, जळगाव, अहिल्यानगर, कोल्हापूर, सांगली, जालना, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, मीरा -भाईंदर.



