लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा सन्मान; महाबळेश्वर येथे पत्रकारांचा गौरव सोहळा संपन्न
रोटरी आणि ईनरव्हील क्लबचा स्तुत्य उपक्रम; सामाजिक बांधिलकीचे उमटले पडसाद
महाबळेश्वर (प्रतिनिधी):लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पत्रकारितेचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी आणि समाजातील ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या पत्रकारांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महाबळेश्वर येथे एका विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. रोटरी क्लब आणि ईनरव्हील क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील कार्यरत पत्रकारांचा शाल,गुलाब पुष्प व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरी क्लबचे अध्यक्ष विजय काळे होते, तर प्रमुख म्हणून ईनरव्हील क्लबच्या अध्यक्षा वर्षा पार्टे उपस्थित होत्या. व्यासपीठावर पत्रकार संघाचे अध्यक्ष अजित जाधव, ज्येष्ठ पत्रकार संजय दस्तुरे, विलास काळे, रमेश पलोड, अभिजित खुरासणे आणि प्रेषित गांधी यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी बोलताना रोटरी अध्यक्ष विजय काळे म्हणाले की, “पत्रकार हा समाजाचा जागरूक घटक असून तो प्रशासन आणि सामान्य नागरिक यांच्यामधील महत्त्वाचा दुवा आहे. सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याचे आणि समाजाला योग्य दिशा देण्याचे कार्य पत्रकार अत्यंत निष्ठेने करत आहेत. त्यांच्या या कार्याचा कृतज्ञतापूर्वक गौरव करणे हे आमचे कर्तव्य आहे.”
पत्रकारांची लेखणी समाजाचे बळ: वर्षा पार्टे
ईनरव्हील क्लबच्या अध्यक्षा वर्षा पार्टे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “पत्रकार हे केवळ बातमीदार नसून सामाजिक बांधिलकी जपणारे मार्गदर्शक आहेत. अनेक आव्हानांना सामोरे जात, वेळ-अवेळ न पाहता समाजाच्या न्याय-हक्कासाठी काम करणाऱ्या या बांधवांविषयी आम्हाला आदर आहे. त्यांच्या लेखणीतून चांगल्या कामाला बळ मिळते.”
शासकीय संस्थांना पत्रकारांचा विसर पडलेला असताना, रोटरी आणि ईनरव्हील क्लबने घेतलेली दखल आम्हा पत्रकारांसाठी भावनिक आणि ऊर्जा देणारी आहे.”
सन्मानित पत्रकार
अनुभवांची शिदोरी आणि कृतज्ञता
यावेळी ज्येष्ठ पत्रकार संजय दस्तुरे व विलास काळे यांनी आपल्या प्रदीर्घ पत्रकारितेतील अनुभव आणि संघर्षाचे पदर उलगडले. सामाजिक जबाबदारी पार पाडताना जनतेचा विश्वास हीच खरी ताकद असल्याचे त्यांनी नमूद केले. सन्मानित पत्रकारांनी या उपक्रमाबद्दल रोटरी व ईनरव्हील क्लबचे आभार मानले आणि भविष्यातही निष्ठेने कार्य सुरू ठेवण्याची ग्वाही दिली.
उपस्थित मान्यवर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सविता पलोड यांनी केले, तर आभार प्रदर्शन रो. दिनेश भिसे यांनी मानले. या सोहळ्याला कुमार कोमटी, ब्रिजभुषण सिंग, महेश कोमटी, डॉ. चोपडे, शिरिष गांधी, रोहीणी वैद्य, तृप्ती तोषणीवाल, राधा मुक्कावार, स्वाती भांगङीया, संतोष पार्टे यांच्यासह दोन्ही क्लबचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




