शिवरायांच्या गडकोटांचे संवर्धन करण्याची जबाबदारी आजच्या तरुणाईवर : प्रा. सूर्यकांत अदाटे
सातारा प्रतिनिधी -शिवकालीन गडकिल्ले जाज्वल राष्ट्रप्रेमाचे आणि मराठी अस्मितेचे प्रतिक असून अशा इतिहासाचे साक्ष देणारे गडकोट आणि मंदिरे यांचे जतन आणि संवर्धन आपण केले पाहिजे. अशा या दैदिप्यमान इतिहासाचा वसा व वारसा जपण्याची जबाबदारी आजच्या महाविद्यालयीन तरुणाईवर आहे, असे प्रतिपादन प्रा. संभाजीराव कदम महाविद्यालय, देऊरचे प्राध्यापक व दुर्ग अभ्यासक सुर्यकांत अदाटे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. मनिषा जाधव यांनी केले तर पाहुण्यांची ओळख कु.मनिषा पिटेकर हिने करून दिली.
कला व वाणिज्य महाविद्यालय, साताराचा राष्ट्रीय सेवा योजनेच्या अजिंक्यतारा किल्ल्यावर आयोजित करण्यात आलेल्या विशेष श्रमसंस्कार शिबिरात ‘गडकिल्ले आणि आपली जबाबदारी’ या विषयावर ते बोलत होते. प्रा.अदाटे पुढे म्हणाले कि, महाराष्ट्रातील गडकिल्ले हे मराठ्यांच्या ज्वलंत इतिहासाचे साक्षीदार आहेत. छत्रपती शिवरायांनी गडकिल्ल्यांचे महत्त्व लक्षात घेऊन अनेक नवे किल्ले उभारले तसेच जुन्या किल्ल्यांची डागडुजी केली. महाराजांनी बांधलेल्या किल्ल्यांची वैशिष्ट्यपूर्ण स्थापत्यशैली, गोमुखी प्रवेशद्वार ही असून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आपल्या जिल्ह्यातील गडकोटांची आणि मंदिरांची ओळख करून घेतली पाहिजे.
ते पुढे म्हणाले कि आज कित्येक गडावरील प्रवेशद्वारे, देवड्या, जंग्या, पाण्याची टाके, चुन्याचे घाणे, विरगळ, सतीशीळा आणि गड अवशेष काळाच्या ओघात नष्ट होऊ लागलेले आहेत. आज साताऱ्यातील प्रत्येक गडकोटांच्यासाठी संवर्धन करणारी संस्था असली तरी आपण त्या ठिकाणी जाऊन स्वच्छता, प्लास्टिक निर्मुलन करून सर्वधनाच्या कार्यास हातभार लावून छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा ऐतिहासिक वारसा असणारे गडकोट आणि त्यावरील वास्तूंचे जतन केले पाहिजे. गडाच्या जवळील मेटे, चर्या, जंग्या, दुहेरी तटबंदी, माची, नेढे, गोमुखी दरवाजा, बुरुंज, बालेकिल्ला, गडदेवता, विरगळ, सतीशीळा, अंबरखाना, राजसदर या संकल्पना समजून घेतल्या पाहिजेत तरच आपल्याला गडकोट व्यवस्थित समजतील.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना डॉ. गौतम काटकर म्हणाले कि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी किल्ल्यांचे विविध प्रकार जाणून घेऊन गडभ्रमंती केली पाहिजे. गडभ्रमंती करताना गडाचा इतिहास आणि भूगोल व्यवस्थितपणे अभ्यासाला पाहिजे. दुर्गभ्रमंतीमुळे आत्मविश्वास वाढतो, वजन नियंत्रणात राहते, ताणतणाव कमी होतो, रोगप्रतिकारक क्षमता वाढते तसेच अनेक शारीरिक व्याधी नाहीशा होतात.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.महेक शेख हिने केले. सदर कार्यक्रमास राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ. उदय लोखंडे, डॉ.विजय पवार, डॉ.जमीर मोमीन, प्रा.संदीप पाटील, डॉ. शिवाजी झांझुरणे, महाविद्यालयातील प्राध्यापकवर्ग व रा.से.यो. स्वयंसेवक बहुसंख्येने उपस्थित होते.




