हिंदवी स्कूलतर्फे बुधवारी पथनाट्याची शंभरी
सातारा- भारतीय संविधान अमृतमहोत्सवी वर्ष, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी वर्ष, वंदे मातरम् गीताचे शतकोत्तर सुवर्णमहोत्सवानिमित्त हिंदवी पब्लिक स्कूलच्या वतीने बुधवारी (ता. २४) शहरात विविध ठिकाणी शंभर पथनाट्ये सादर करण्यात येणार आहेत, अशी माहिती श्रीनिधी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अमित कुलकर्णी यांनी दिली.
श्री. कुलकर्णी यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दीनिमित्त सरसंघचालक मोहन भागवत पंच परिवर्तन हा कार्यक्रम दिला आहे. ‘संविधान’ व ‘पाच सामाजिक प्राधान्याचे विषय’ अशा सहा विषयांबाबत सामाजिक जागृती व विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्ती प्रतिभेला प्रोत्साहन देण्यासाठी हिंदवी पब्लिक स्कूलतर्फे ‘पथनाट्य शंभरी’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
सातारा शहरातील विविध चौकांत हिंदवी पब्लिक स्कूलचे विद्यार्थी आपल्या सादरीकरणाद्वारे बुधवारी सकाळी दहा ते दुपारी १२ वाजता एकाच दिवशी, निर्धारित वेळात शंभर प्रयोग सादर करणार आहेत. या उपक्रमात नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन श्री. कुलकर्णी यांनी केले आहे.



