कास पठारावर रस्त्यालगत जाळपट्टा काढण्याचे काम; समिती व वनविभागाकडून संयुक्त उपक्रम
सातारा प्रतिनिधी :जागतिक वारसा स्थळ असलेल्या कास पठारावरील वनसंपदा सुरक्षित ठेवण्यासाठी कास पठार कार्यकारी समिती व सातारा वनविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सातारा–कास रस्त्यालगत जाळपट्टा (फायर लाईन) काढण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. वनव्याचा धोका टाळण्यासाठी ही उपाययोजना राबविण्यात आली आहे.
कास पठारावरील कुंपणाची जाळी दीड ते दोन वर्षांपूर्वी काढण्यात आली होती. त्यानंतर काही समाजकंटक व विघ्नसंतोषी प्रवृत्तींकडून वनवा लावण्याचे प्रकार घडू नयेत, यासाठी वनविभाग व कार्यकारी समिती सातत्याने सतर्क आहे.अविवेकी लोकांकडून वनवा लावण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर रस्त्यालगत जाळपट्टा काढण्यात आला आहे.
या जाळपट्ट्यामुळे वनव्याचा प्रसार रोखण्यास मदत होणार असून मौल्यवान वनसंपत्तीचे संरक्षण होणार आहे. या कामात कास पठार कार्यकारी समितीचे स्वयंसेवक व वनविभागाचे कर्मचारी सहभागी झाले होते. पर्यावरणाचा समतोल बिघडू नये व वनवा लागू नये, यासाठी डिसेंबर महिन्यात रस्त्यालगत काही अंतरावर जळा-रेषा काढण्याचे काम पूर्ण करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली.
दरम्यान, हुल्लडबाज व अविवेकी प्रवृत्तींकडून वनवा लावण्याचे प्रकार टाळण्यासाठी नागरिकांनीही दक्षता घेणे आवश्यक असल्याचे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे. वनवा प्रतिबंधासाठी जाळपट्टा काढण्याचे काम पूर्ण झाले असून त्यामुळे अशा प्रवृत्तींना आळा बसणार असल्याचे वनपाल राजाराम काशीद यांनी सांगितले. या कामी वरिष्ठांचे महत्त्वाचे मार्गदर्शन लाभले.




