पुसेगाव येथे लाखो भाविकांच्या उपस्थितीत प.पू. सेवागिरी महाराज रथोत्सव भक्तीभावात संपन्न
पुसेगाव :महाराष्ट्रासह देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तीर्थक्षेत्र पुसेगाव येथे ब्रम्हलीन, तपोनिधी, सिद्धहस्त योगी परमपूज्य सदगुरु सेवागिरी महाराज यांच्या संजीवन समाधीचा अमृतमहोत्सवी रथोत्सव मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने पुसेगाव नगरी भक्तीमय वातावरणाने भारून गेली होती.
परमपूज्य सेवागिरी महाराजांनी समाजातील अनिष्ट रूढी, परंपरा, अंधश्रद्धा व बुवाबाजीला ठाम विरोध करत समाजाला योग्य दिशा दिली. अनेक कुटुंबांचे संसार सावरत निराधारांना आधार, उपाशी लोकांना अन्न तर निराश्रितांना आश्रय देण्याचे कार्य त्यांनी आयुष्यभर केले. त्यांच्या विचारांनी समाजाला जगण्याचा नवा मार्ग मिळाला, अशी भावना यावेळी उपस्थित भाविकांनी व्यक्त केली.
अमृतमहोत्सवानिमित्त विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये युवा महोत्सव, राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन तसेच भव्य जनावरांचा बाजार भाविक व नागरिकांचे विशेष आकर्षण ठरले.
या रथोत्सव सोहळ्यास आ.शशिकांत शिंदे, आ. महेश शिंदे, आ. मनोज घोरपडे, चेअरमन संतोष वाघ, विश्वस्त डॉ. सुरेश जाधव, विश्वस्त गौरव जाधव, विश्वस्त सचिन जाधव, विश्वस्त संतोष जाधव, विश्वस्त रणधीर जाधव यांच्यासह देवस्थानचे पदाधिकारी, मान्यवर व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्ट व स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले.




