शेतकऱ्यांना अन्नप्रक्रिया उद्योग उभारणीसाठी बॅंकांनी तातडीने वित्त पुरवठा करावा– जिल्हाधिकारी संतोष पाटील
सातारा: प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत उद्योग उभारणीसाठी शेतकऱ्यांकडून आलेल्या प्रस्तावांवर सकारात्मक निर्णय घेऊन मंजुरी द्यावी. मंजूर प्रस्तावानुसार शेतकऱ्यांना उद्योग उभारणीसाठी बँकांनी तातडीने वित्त पुरवठा करावा. वित्त पुरवठ्याची प्रक्रिया जलदगतीने व्हावी यासाठी कृषी विभागाने दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात कृषी विभागातील कामकाजाचा आढावा घेण्यात आला. या आढावा बैठकीला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे, जिल्हा उपनिबंधक संजय सुद्रीक यांच्यासह कृषी विभागातील अधिकारी उपस्थित होते.
प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत सुरु झालेल्या कृषी उद्योगांची पाहणी करावी, असे निर्देश देऊन जिल्हाधिकारी श्री. पाटील म्हणाले, या उद्योगांच्या यशकथा समाज माध्यमांवर प्रसिद्ध कराव्यात, यामुळे योजनेची इतर शेतकऱ्यांना माहिती होण्याबरोबर उद्योजक शेतकऱ्याला लाभ होईल. कांदाटी खोरे एकात्मिक विकास प्रकल्पाचा आढावा घेताना जिल्हाधिकारी श्री. पाटील म्हणाले, कांदाटी खोऱ्यातील 16 गावांमधील शेतकऱ्यांना मधमाशी पालनासाठी प्रोत्साहित करावे. त्यांना मधमाशी पालनासाठी लागणाऱ्या पेट्या सीएसआर फंडातून देण्यात येतील. कांदाटी खोऱ्यात पर्यटन वाढीसाठीही प्रयत्न करण्यात येत आहे. येथील ज्या कुटुंबांना घरकुल योजना मंजूर झाली आहे त्यांची यादी द्यावी, घरकुल मंजुर झालेल्या कुटुंबाला होम स्टे योजनेअंतर्गत एक खोली काढण्यासाठी सीएसआर फंडतून मदत केली जाईल. तसेच पर्यटकांसाठी होम स्टेच्या माध्यमातून इतर सुविधा वाढवण्यात येतील. त्याचबरोबर कृषी विभागाने पर्यटन व्यवसायिकांशी संपर्क साधून या भागात सहलींचे नियोजन करावे, यामुळे तेथील व्यवसाय वाढण्यास मदत होईल, असेही जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी बैठकीत सांगितले.
खटाव तालुक्यातील सुर्याचीवाडी या गावाचा आदर्श गाव योजनेमध्ये समावेश करण्यात आला आहे. येथील मंजूर कामे येत्या 31 मार्च पर्यंत पूर्ण करावीत. तसेच येथील नागरिकांचे जीवनमान उंचविण्यासाठी त्यांच्या उद्योग व्यवसायाला कृषी विभागाने मदत करावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी केल्या.




