पुण्यातील ‘अजिंक्य डीवाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनीअरिंग’ला सर्वोत्तम खासगी अभियांत्रिकी संस्थेचा राष्ट्रीय पुरस्कार
पुणे : शिक्षण क्षेत्रात सातत्याने नवनव्या उंची गाठत असलेल्या लोहेगाव येथील अजिंक्य डीवाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनीअरिंग (ADYPSOE) या महाविद्यालयाने राष्ट्रीय पातळीवर आघाडीची कामगिरी नोंदवली आहे. इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन (ISTE) यांच्या ५५व्या राष्ट्रीय वार्षिक प्राध्यापक परिषदेत महाविद्यालयाला ‘सर्वोत्तम खासगी अभियांत्रिकी शिक्षण संस्था – २०२५’ हा मानाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला. पाँडिचेरी येथील एस. एम. व्ही. अभियांत्रिकी महाविद्यालयात झालेल्या या परिषदेत हा सन्मान प्रदान करण्यात आला.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. फारुक सय्यद यांनी संस्थेच्या वतीने पुरस्कार स्वीकारताना “हे यश प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्व विभागातील सहकाऱ्यांच्या समर्पण व सांघिक कार्याची फलश्रुती आहे. हा पुरस्कार माझ्या सर्व सहकाऱ्यांना आणि विद्यार्थ्यांना समर्पित करतो,” अशी भावना व्यक्त केली. तांत्रिक शिक्षण क्षेत्रातील ISTE राष्ट्रीय पुरस्कार हा अत्यंत प्रतिष्ठेचा मान समजला जात असल्याने या गौरवाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.
या यशामागे अजिंक्य डीवाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर. के. जैन यांचे मार्गदर्शन उपयुक्त ठरले. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर अजिंक्य डीवाय. पाटील संस्था समूहाचे अध्यक्ष डॉ. अजिंक्य डीवाय. पाटील आणि कार्यकारी उपाध्यक्षा डॉ. कमलजीत कौर यांनी महाविद्यालयाचे मन:पूर्वक अभिनंदन केले.
ADYPSOE ने मिळवलेला हा राष्ट्रीय सन्मान पुणे शहरासाठी तसेच राज्यातील तांत्रिक शिक्षण क्षेत्रासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे.




