महाबळेश्वर टॅक्सी संघटनेकडून हिंदू-मुस्लीम ऐक्याची नांदी! श्री दत्त मंदिराचा भव्य उद्घाटन सोहळा; छत्रपती उदयनराजे भोसले आणि नामदार मकरंद (आबा) पाटील यांची उपस्थिती
महाबळेश्वर (प्रतिनिधी): धार्मिक सलोख्याचे आणि हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक असलेल्या महाबळेश्वर नगरीत, स्थानिक टॅक्सी व्यावसायिक संघटनेच्या वतीने जीर्णोद्धार करण्यात आलेल्या नूतन श्री दत्त मंदिराचा तीन दिवसीय प्राणप्रतिष्ठापना, कलशारोहण आणि भव्य उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. टॅक्सी संघटनेतील सर्वधर्मीय बांधवांनी एकत्र येत हा उपक्रम यशस्वी केल्यामुळे, महाबळेश्वरमध्ये सामाजिक एकतेचा एक नवा अध्याय लिहिला गेला आहे.
शके १९४७, मार्गशीर्ष शुद्ध द्वादशी ते पौर्णिमा या शुभ काळात म्हणजेच २ डिसेंबर २०२५ (मंगळवार) पासून ४ डिसेंबर २०२५ (गुरुवार) पर्यंत हा भक्तीमय सोहळा संपन्न होणार आहे.
मान्यवरांची मांदियाळी
या सोहळ्याला महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाचे राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचे प्रमुख उद्घाटक म्हणून मा. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले (खासदार, सातारा लोकसभा) आणि मा. नामदार श्री. मकरंद (आबा) पाटील (मदत व पुनर्वसन मंत्री, महाराष्ट्र राज्य)मा. ना. शंभूराज देसाई (पालकमंत्री सातारा जिल्हा), मा. आ. श्री. शशिकांत शिंदे साहेब, मा. खासदार श्री. नितिन (काका) पाटील, आणि इतर स्थानिक व जिल्ह्यातील पदाधिकारी तसेच प्रशासकीय अधिकारी यांचीही प्रमुख उपस्थिती राहणार आहे.हे उपस्थित राहून सोहळ्याची शोभा वाढवणार आहेत.
याशिवाय, महाबळेश्वर नगरपालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी मा.श्री.योगेशजी पाटील साहेब तसेच महाबळेश्वर शहरातील सर्व सामाजिक,सांस्कृतिक,राजकीय,शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर आणि महाबळेश्वर तालुक्यातील मान्यवर तसेच देणगीदार,अन्नदाते आणि महाबळेश्र्वर तालुका वारकरी सांप्रदाय मंडळ यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
तीन दिवसीय धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाची रूपरेषा:
पहिले दिवस: मंगळवार, ०२ डिसेंबर २०२५
सायं. ५ वा.: श्रींच्या पादुकांना श्रीक्षेत्र महाबळेश्वर येथे महाअभिषेक
सायं. ६ वा.: श्री दत्त व श्री महालक्ष्मी मूर्तींना धान्यवास (मूर्ती धान्यात ठेवणे).
दुसरा दिवस:बुधवार, ०३ डिसेंबर २०२५ (प्राणप्रतिष्ठापना व भक्तीचा जागर)
हा दिवस धार्मिक विधींसाठी अत्यंत महत्त्वाचा असून, पहाटेपासून विधींना सुरुवात होईल.
पहाटे ६ वा. ते दुपारपर्यंत: मंगलचरण, संकल्प, पुण्याहवाचन, नवग्रह व पीठ देवता स्थापना, जलाधिवास, रूद्राभिषेक, सप्तस्नाने, हवन, बलिदान व पूर्णाहूती असे विधी पार पडतील.
सकाळी ११.४५ वा.: श्री दत्त व लक्ष्मीमाता मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना (वेदाचार्य श्री खरे काका, वाई यांचे हस्ते).
दुपारी १२.४५ वा.: कलशारोहण (परमपूज्य श्री. अभयानंद स्वामीजी, श्री काडसिद्धेश्वर आश्रम, मश्वर यांचे हस्ते).
सुस्वर भजनांचा कार्यक्रम:या दिवशी दुपारी १ वाजेपासून विविध भजनी मंडळांचे कार्यक्रम होणार आहेत, ज्यात श्री जननीमाता प्रासादिक भजनी मंडळ (बोंडारवाडी), स्वर साधना श्री. बुधाजी सुतार भजन मंडळ (मश्वर), आणि गोपाळ कृष्ण भजन मंडळ (मेटगुताड) यांचा समावेश असेल.
तिसरा दिवस: गुरुवार, ०४ डिसेंबर २०२५ (उद्घाटन व महाप्रसाद)
सकाळी ६ वा.: श्रींच्या मूर्तीस महाअभिषेक.
सकाळी ९ ते ११ वा.: श्री सत्यदत्त महापूजा.
दुपारी १२ वा.: श्री दत्त जन्म सोहळा, सुंठवडा व तिर्थप्रसाद वाटप.
दुपारी १ वा.: सर्व मान्यवरांच्या हस्ते मंदिर उद्घाटन सोहळा.
दुपारी २ ते १० वा.: महाप्रसाद.
भजनांचा कार्यक्रम: सौ. माधुरी धोत्रे महिला भजन मंडळ (मश्वर), शाम जेधे भजन मंडळ (महाबळेश्वर), माऊली भजन मंडळ (श्री प्रभाकर देवकर, महाबळेश्वर), आणि साई कुंभळजाई भजन मंडळ (क्षेत्रमहाबळेश्वर) यांसह इतर भजनी मंडळांची उपस्थिती रात्री १० वाजेपर्यंत राहील.
महाबळेश्वर स्थानिक टॅक्सी व्यावसायिक संघटनेने परिसरातील सर्व भाविक भक्तांनी या मंगल सोहळ्यास उपस्थित राहून दर्शनाचा, भक्तीमय वातावरणाचा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.




